चुरगाळलेले पुस्तक

मागच्या आठवड्यात रेल्वे प्रवासात होतो, पुण्याहुन अमरावतीला जात होतो. सर्व प्रवाशी स्थिर स्थावर झाले, आपापल्या कोशात घुसले किंवा घुसण्याच्या प्रयत्नात होते. मी पण तसाच आहे, एकतर पुस्तक वाचत बसायचं किंवा खिडकीतुन बाहेर बघत बसायचं.  सहसा मी लगेच मिसळत किंवा बोलत नाही. पण यावेळी माझ्याकडे पुस्तक पण नव्हते आणि खिडकी पण दुर होती. बाजुच्या माणसाची थोडी विचारपुस चर्चा केली व मग नंतर शांत बसुन लोकांना न्याहाळत होतो.

एक सहप्रवाशी गृहस्थ होते, त्यांनी एक पुस्तक बाहेर काढले, बहुदा त्यांना पण वाचनाची आवड असावी. आणि त्यांनी चष्मा वगैरे लावुन पुस्तक वाचायला सुरु केले. मी पण एक पुस्तक वेडा असल्यामुळे, वाचणाऱ्याबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. पण त्या पुस्तकाकडे बघुन मात्र मी गोंधळुन गेलो. पुस्तकाची अवस्था वाईट होती. अगदी चुरगाळलेल्या अवस्थेत दिसत होतं. ठिकठिकाणी पानं दुमडलेली होती. विचार केला हि अवस्था का झाली असावी, अनावधानाने पिशवीत कोंबल्या गेलं असेल का? पण मग पानं का दुमडली आहेत? साठीतले छान इस्त्री केलेला सदरा विजार घातलेले ते गृहस्थ मन लावुन पुस्तक वाचत होते. मला वाटलं त्यांच्या घरी नक्कीच कोणीतरी तरुण हौशी वाचक असावा ज्याने पुस्तकाची हि अवस्था केली असेल. पण माझा भ्रम अर्धा एक तासच टिकला. त्यांना फोन आला कि फोन करायचा होता म्हणुन त्यांनी पुस्तक वाचण थांबवलं आणि खुण म्हणुन कचकन पान दुमडुन पुस्तक बंद केलं. मला त्या पुस्तकासाठी वाईट वाटले आणि त्या माणसाचे आश्चर्य. एवढा वयस्कर माणुस पुस्तकाला असे हाताळु शकतो. म्हटलं चला, पुस्तकं मन लावुन वाचणारा एक अज्ञानी आज बघायला मिळाला.

जेवणं झाली मी माझ्या वरच्या बाकावर झोपायला गेलो. थोड्या वेळाने खाली बसलेल्या प्रवाशांमध्ये अध्यात्मावर आणि आत्म ज्ञानावर चर्चा रंगली. आपापली मते माडल्या जात होती. मी उत्सुकतेने ऐकत होतो. तेवढ्यात मला एक आवाज त्या पुस्तक वाचणाऱ्या माणसासारखा वाटला, पण विश्वास बसेना म्हणुन खाली डोकावुन पाहिले तर तेच भले गृहस्थ लोकांना ज्ञान देत होते. हे कसं बरोबर ते कसं वाईट. मोठ्या पोट तिडकीने सांगत होते कि मी अम्मा भगवानांचा अनुयायी आहे त्यांची माझ्यावर खुप कृपा आहे. ते म्हणाले, "ज्या मनुष्याला आई वडिलांचा आशीर्वाद लाभत नाही तो माणुस जीवनात कधीही यशस्वी होत नाही. मी मुलांना शिकवतो आणि शिकवण्या पण घेतो. मी मुलांना नेहमी सांगतो कि तुम्हाला जर २० टक्क्यांनी प्रगती करायची असेल तर १० टक्के मी करवुन देईल व १० टक्के आई वडिलांच्या आशीर्वादाने होईल. तेंव्हा रोज सकाळी उठल्यावर आधी आईच्या व मग वडिलांच्या पाया पडत चला".

मला त्यांची गंमत वाटली. म्हटलं जो माणुस ज्ञानदान करणाऱ्या पुस्तकांना रद्दी सारखी वागणुक देतो तो आपल्या विद्यार्थ्यांवर खरच काय संस्कार करणार. मला कोणाच्या श्रद्धेची टिंगल उडवायची नाही, पण जर ह्या माणसाने आपल्या आयुष्यात आई वडिलांना एवढा सन्मान आणि आदर दिला असेल तर ह्यांना अम्मा-भगवान सारख्या, स्वत:ला ईश्वराचा अवतार मानणाऱ्या, मानवुन घेणाऱ्या आणि चमत्कार दाखवणाऱ्या बुवाबाजांच्या शरणात जाण्याची गरज का पडावी. माणसाच्या विसंगत वागण्याची कधी कधी हद्द होऊन जाते. तुम्ही दुसऱ्यांना फसवता इथपर्यंत ठीक पण तुम्ही स्वत:लाच फसवायला लागता तेंव्हा तो एक प्रकारचा मानसिक असंतोल म्हणता येईल. त्यांचे सुंदर विचार ऐकत कधी झोप लागली ते कळालेच नाही.

[धन्यवाद!]

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

एक छोटीशी पुडी

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा