चित्रपट समीक्षा - 'सैराट'




मी सैराट बराच उशीरा म्हणजे आत्ता बघितला. काही ना काही कारणास्तव तो बघायचा राहूनच गेला. आणि ह्या सहा महिन्यात दूरचित्रवाणी वर त्याच्या गाण्यांची आणि दृश्यांची इतकी उजळणी होऊन चुकली होती कि वाटलं होतं आता आणखी काही उरलं असेल का बघायला. पण बघायला मजा आली.

दिग्दर्शन, संवाद लेखन आणि पात्रांची निवड यामध्ये चित्रपट पुर्ण गुण मिळवुन जातो. कथा छोटी आणि यापुर्वी बरेचदा सांगितल्या गेलेली आणि बघितल्या गेलेली. त्यामुळे इतर बाजुंवर दिग्दर्शकाने बरीच मेहनत घेतली हे दिसुन येतं. अजय अतुल यांनी परत एकदा जादु दाखवली आणि चित्रपटाला संगीत चित्रपट हा दर्जा लाभला.
फँड्री नंतर त्याच कथेतला एक दुवा पकडुन अत्यंत सफल रीत्या हि प्रेम कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात नागराज मंजुळे यांना यश आलं आहे. रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी पदार्पणात केलेल्या कामगिरीची कमाल वाटत राहते.


उत्तरार्धात मात्र चित्रपट थोडा भरकटल्या सारखा झालाय. कथेत जरी नाही तरी दिग्दर्शनात नक्कीच. आणि त्याचमुळे उत्तरार्ध लहान असुनही थोडा रेंगाळलेला वाटतो. परश्या आणि आर्चीचा वास्तवाशी सामना आणि अस्तित्वासाठी संघर्ष उलगडुन दाखविण्याच्या नादात पटकथेवरची पकड सुटली. दुसऱ्या राज्यातील भाषा येत नसल्यामुळे अर्थातच संवाद कमीत कमी ठेवुन सगळे प्रसंग दाखवायचे होते आणि ते प्रभावी पण व्हायला हवे होते. यात हवं तसं यश आलेलं नाही. आणि उत्तरार्धात संगीताशी अचानक घेतलेला घटस्फोट पण कळला नाही. अजय-अतुल यांना खरं तर उत्तरार्धात प्रचंड वाव होता जो वाया दवडविण्यात आलेला आहे. एखादं आशय प्रधान गाणं पार्श्वभूमीवर वाजत असतांना कथा आहे तशीच पुढे सरकवता आली असती. दोन भागातली ही विषमता अंगावर येते. पण बऱ्याच लोकांना ती पटकथेची गरज वाटली आहे. गाणी म्हणजे स्वप्न रंजन आणि वास्तव म्हणजे करुण क्रंदन असं काहीतरी दिग्दर्शकाला अभिप्रेत आहे.



काही छोटया गोष्टी ज्या खटकल्या:

१. ह्या पाच सहा वर्षात जसा परश्या आणि आर्ची मधे दिसण्यात वयाचा बदल दाखवला आहे तो प्रिंस मधे का दिसुन येऊ नये?
२. जरी कथा दोघांची होती तरी, जिवाभावाच्या मित्रांना खुषहाली कळविण्याचे सौजन्य परश्याने अर्थात दिग्दर्शकाने दाखवायला हवे होते.
३. पाटलाची पोर झाली म्हणुन काय आर्चीला साधा लसूण सोलता येऊ नये, भाकरी थापायला थोडयाच सांगितल्या होत्या?
४. हैदराबादला गेल्यावर बऱ्याच दिवसांनी ते दोघे लग्न करतात. मुलगा जवळपास दीड दोन वर्षांचा दाखवला आहे. शुन्यातुन सुरुवात करून २०-२५ हजार रुपये पगारापर्यंत पोहोचायला आणि फर्राटेदार तेलगु शिकायला एकंदर बराच (पाच ते सात वर्षे) काळ लोटला असावा. आर्ची पहिल्या दिवसापासुन घरच्या आठवणीने हैराण होते. ती तिच्या मैत्रिणीशी फोनवर बरेचदा बोलते तर मग पाटलांना यांना शोधायला इतकी वर्षे लागावी आणि आधीच राजकारणात नामोहरम झालेल्या पाटलाने इतकी हिंमत करावी?


शेवटच दृश्य चांगलं जमुन आलंय. कथेचा शेवट हीच खरी या कथेची ताकत आहे. एक दुजे के लिए आणि कयामत से कयामत तक अशा चित्रपटातून आपण असा दु:खद अंत झेलला आहे परंतु इथे तोच शेवट अगदी धक्का देऊन जातो. रक्त रंजित पावलाने नवी पिढी जगात पाउल ठेवत आहे हि कल्पना खरच शहारा आणते.

दृश्य एकदम मुक न ठेवता बाळाचा बोबडया बोलातील थोडा आक्रोश आणखी हेलावुन गेला असता. शेवटची नामावली सुरु असतांना आर्ची आणि परशाचा प्रेमप्रवास चित्र रुपात परत एकदा सादर करणं प्रभावी होऊ शकलं असतं. चित्रपट जवळ जवळ ३ तासांचा असुनही खिळवुन ठेवण्यात यशस्वी झाला आहे.

६६व्या आंतरराष्ट्रीय बर्लिन चित्रपट महोत्सवात उभ्याने टाळ्या घेणारा हा चित्रपट ठरला हे ऐकुन अभिमानाने उर भरून येतं. चित्रपटाच्या संपुर्ण चमुचे मन:पुर्वक अभिनंदन.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

एक छोटीशी पुडी