बेलाची पानं आणि अलुवेरा





एकदा तेरवीला एका खेड्यात गेलो होतो. कार्यक्रम आटोपला जेवणं झाली, मग दुपारी अडीचच्या सुमारास परतीस निघालो. चालत बस थांब्यावर आलो. तीन वाजताची बस होती. तिथे झाडाखाली ३-४ बाया आधीच बसल्या होत्या. हळुहळु तिथे गर्दी वाढत गेली. तेरवीला आलेली सगळी वयस्कर माणसं एक एक करून तिथे बसची वाट बघत थांबली. काही लोकांच्या दुचाक्या, फटफट्या होत्या त्यावर ३-३ माणसं बसुन गाव जवळ करू लागली. जास्तीत जास्त लोक आसपासच्या खेड्यावरील होते. शेती कामाचे दिवस. बस आली व पुढच्या गावाला निघुन गेली, जिथुन परतुन ती येणार होती. लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला चला, आता जाणं नक्की. कारण खेडेगावात बस हे मुख्य प्रवासी साधन असलं तरी हमखास येणारच याची खात्री आजच्या तारखेत पण कोणी देऊ शकत नाही. तसं झाल्यास मग ऑटोरिक्षा, ट्रॅॅक्टर, टेम्पो झालंच तर बैलगाडी अशा साधनांचा सहारा. तिकीटांचे दर आकाशाला भिडलेले असले तरी सामान्य माणुस एसटी काही सोडत नाही. त्याला मुख्य कारण म्हणजे ह्या ना त्या कारणाने मिळणाऱ्या सवलती. जेष्ठ नागरिकांना अर्धी तिकीट, अपंगांना पाव, विद्यार्थ्यांना बस पास वगैरे वगैरे भरपुर सवलती असतात. म्हणुन हे नातं अधिकच घट्ट होऊन बसलंय.

पंधरा मिनिटं झाली, अजुन पंधरा मिनिटांनी गाडी येणार अशी चर्चा. तेवढ्यात एक माणुस व एक बाई आपल्या डोक्यावर मोठमोठे भारे घेऊन आले आणि त्यांनी झाडाखाली भारे टाकले. कोण्या तरी झाडाचा पाला दिसत होता. त्यांच्यासोबत एक १२-१३ वर्षाचा पोरगा पण होता. एव्हाना थांब्यावर २५-३० लोक जमले होते. जास्त करून बायाच होत्या.

पहिली बाई: अई माय, बेलाचे पानं दिसुन रायले हे तं.
दुसरी बाई: अव हव्वं, उद्या श्रावण सोमवार नाई काय बिचारे, विकाले निउन रायला असन अमरावतीले.
पहिली बाईकेवढ्याले विकता हो भाऊ बेल तिकडे?
बेलवाला: १० रुपयाले एक पुडा.
पहिली बाई: पाय व माय एवड्याश्या बेलाचे धा रुपये.
दुसरी बाई: लोकई काय करन वं, शहरात आन्तीन कुठुन बेल?
पहिली बाई: बरोबर म्हंतं तु. पन पाय बरं, ह्या पाल्याचे किती पैसे करन थो आता.

तेवढ्यात त्या माणसाचा ओळखीचा एक जण रस्त्याने जाता जाता त्याला म्हणाला,  "वारे चंद्या, लेका ३-४ हजार आरामात करतं तु ह्या भाऱ्याईचे".
बेलवाला: कायचे हो भाऊ..., हजार, दीड हजार होतीन जास्तीत जास्त.
"कोनाले सांगुन रायला बे", तो माणुस म्हणाला. बेलवाला नुसतं हसुन गप्प बसला.

पाउण तास उलटुन गेला पण गाडीचा काही पत्ता नव्हता, लोकांमध्ये चुळबुळ सुरु झाली होती.

पहिली बाईकई येते वं माय गाडी?
दुसरी बाई: हव ना माय एकतं सगळे हातपाय दुखुन रायले. हे पाय लयच तरास देऊन रायले बापा आता. ना धड चालता येत ना काई. बसलं त उठुई देत नाई. कायच कराव कोन जाने.
तिसरी बाई: मायई तसच हाय वं. काय शुगर का फुगर झाली म्हनते, टोंगये(गुडघे)  तं ह्यां सुजते कधी कधी का हालुच नको म्हनते जागची.
दुसरी बाई: शुगर न दुखते कावं जास्त? मले असन का वं मंग शुगर? तपासुन घ्या लागन बइ.

इतक्या वेळ शांत उभा राहुन बायांची चर्चा असणारा तो बेलवाला इसम अचानक गप्पांमध्ये सहभागी झाला, "काकु कुठं दुखते तुमचे पायं? टोंगयेच दुखते का पोटऱ्याई दुखते.

दुसरी बाई:  तसे तं सारेच पाय दुखते पन टोंगयेच लय तरास देते राजा.
बेलवाला: रुईचं पान बांधुन पायना रात्री झोपतांना.

मग त्याने कसं बांधायचं वगैरे त्या बाईला सांगितलं. त्याने आवर्जुन सांगितलं कि मी ह्याच गावाचा आहे आणि मी झाडपाल्याचं औषध देतो दुखण्या खुपण्यावर. एक दोन नावं सांगितले ज्यांना औषध सुरु आहे. एका मागुन एक बाई पुढे येऊन आपापली तक्रार सांगु लागली. त्याने एक दोन उपाय सांगितले. नंतर म्हणाला, माये सासरे हाय चंद्रपुरात, थे सगळ्या रोगाईवर औषध देते. चंद्रपुर वरून आनते औषध. परवाच येऊन रायले. आत्ता त गेले, येनार नवते पन थ्या खालच्या गावातल्या लोकाईन औषधं सांगितले हाय ना त्याईले.

मग तो सासऱ्यांचं गुणगाण करू लागला, "तुमच्या सगळ्या डाक्टरनं सोडुन देल्लं का लोकं येते माया सासऱ्याजवळ. अरे लकवा होता एकाले, हात उचलेच नाई त्याचा. दोनच दिवसात हात हालवाले लागला, आता वखर वायते वावरात. काय देल्लं औषध, गोमित्र, तुळशी अन अलुवेरा".  गोमित्र अन तुळशी तेवढं लोकांना कळलं.

एकानं विचारलं, "थे पुढचं काय म्हटलं आलु काय?"
बेलवाला: अलुवेरा. असते थे एक झाड?

मला कळलं होतं त्याला  कोरफड(Aloe Vera) म्हणायचं होतं. मला नवल वाटलं कि कोरफड न म्हणता तो अलुवेरा का सांगतोय.


हळुहळु माणसांचे पण कान टवकारले. त्याची विचारपुस करू लागले. कुठला आहेस? औषध कशाचं आहे? पैसे किती लागतील? त्याची बायको बायांशी बोलत होती हा माणसांशी. अधुन मधुन सोबत असलेला पोरगा पण मायबापाच्या बोलण्याला दुजोरा देत होता. त्याला स्वत:ला कसा फायदा झाला हे सांगत होता. एव्हाना भ्रमणध्वनी क्रमांकाची देवाणघेवाण चालु झाली होती.

बेलवाला:  हो दादा, भोई(एक जात) हो मी. खोटा नाई बोलत. तवरीत आराम पडते शंभर टक्के. अन दादा मी त गावातच हाय. अन कोनत्या बापाले वाटन काय का आपल्या पोरीले अन जवायाले शिव्या बसल्या पायजे म्हनून. अन पैशे माया सासरा नगदी नाई घेत. तुमचं आधार कार्ड लागते. ब्यांकेत डायरेक्ट जमा करा लागते पैशे. अन जर का गुन नाई आला ना, त तुमचे सर्वे पैशे परत. एक पैसा ठेवणार नाई तुमचा थे.


आता चकित व्हायची पाळी माझी होती. मी मनात म्हणालो हा जडी बुटी झाडपाल्याचा औषध देणारा माणुस पैसे थेट ब्यांकेत जमा करण्याचं म्हणतोय आणि गुण नाई आला तर परत देणार म्हणतो. असे औषध देणारे मी आधी पण ऐकले आणि पाहिले होते. म्हणुन सुरुवातीला मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नव्हते. पण त्याच्या बोलण्यातला विश्वास बघुन मला कौतुक वाटत होतं आणि  हे काही वेगळंच प्रकरण दिसतंय असही वाटलं. पण खरी चकित होण्याची पाळी तर आता होती. तो पुढे म्हणाला, "हे औषध आमी नाई बनवत. कंपनीचं हाय. लोधीयानात बनते, तुम्हाले विश्वास बसत नसन तं तुम्ही ऑनलाईन पाऊन घ्या." मग त्याने कोण्यातरी कंपनीचं नाव सांगितलं आणि क्षणात मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. माझं कौतुक जमीनदोस्त झालं. त्याचे सासरे कोणी वैद्य वगैरे नसुन हे पुर्ण कुटुंब एका आयुर्वेदिक कंपनी उत्पादनाच्या साखळी प्रचार प्रणालीचे(Multi-Level Marketing) सदस्य होते. आणि ते इतर लोकांना त्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत होते.

आंतर्जाल(internet)आणि भ्रमणध्वनी(mobile phone)या जोडगोळीने अशा गोष्टींचा प्रचार इतक्या खोलवर अगदी सहज होतांना पाहुन माझी काय प्रतिक्रिया असावी मलाच कळेना .  त्यापेक्षा ती माणसं खरच झाडपाल्याचा औषध देणारी असती आणि त्यांच्या औषधाला ३० टक्के जरी गुण असता तरी मला मनापासुन आनंद वाटला असता. यथावकाश गाडी आली. आम्ही सगळे गाडीत बसलो. त्या माणसाने आपल्या मुलाच्या मदतीने बेलाचे भारे टपावर चढवले आणि ते तिघेही गाडीत येऊन बसले. बेलाच्या पानांचा शहराकडे आणि कोरफडीचा अलुवेरा बनण्याकडे प्रवास सुरु झाला होता.

टिप्पण्या

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. Bar zal bus ushira ali nayta khulasa zala nasata.... Tervi jyanchi hoti tyanchya atmlyala shanti milo..

    उत्तर द्याहटवा
  3. खुपच छान लिहिले आणि खरेच आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

एक छोटीशी पुडी