आपण तयार आहोत का?


जगाच्या निर्मितीपासूनच सगळा डोलारा अद्यापही निसर्गाने अगदी व्यवस्थित सांभाळला आहे आणि त्यामुळेच उत्क्रांती प्रक्रियेतून मानवाची निर्मिती शक्य झाली. मानवाला कधी कधी ह्या गोष्टीचा विसर पडतो आणि मग त्याला आठवण करून देण्यासाठी निसर्ग आपली खेळी करतो. जगात कोरोना साथीची सुरुवात होऊन जवळ जवळ दहा महिने होत आले. आणि संपूर्ण धोका टळायला दोनेक वर्षे तरी लागतील. त्यानंतर कदाचित मग ही साथ इतिहासात जमा होईल घेतलेल्या बळींच्या संख्येसहीत. अशा महामारीच्या निवारणात घडलेल्या इतिहासातील चुकांमधून आपण काही शिकलो आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे.  गेल्या तीनशे वर्षात विज्ञान क्षेत्रात झालेली नेत्रदीपक कामगिरी लक्षात घेता आपण मानवजातीने एव्हाना अशा संकटांसाठी तयार असायला हवे होते, पण तसे होत नसते. प्रगतीचे परिणाम हे सर्वंकष असतात, त्याची फक्त उजवी बाजू लक्षात घेऊन स्वत:ची पाठ थोपटत राहिल्यास, एक डोळ्यांनी न दिसू शकणारा विषाणूसम जीव देखील तुम्हाला नामोहरम करून तुमची पायरी दाखवून देऊ शकतो.



कोरोना महामारीच्या फैलावात चीनचा सहभाग हा आंतराष्ट्रीय अन्वेषणाचा विषय आहे म्हणून सध्यातरी आपण ही साथ कालांतराने येत राहणाऱ्या नैसर्गिक साथींपैकीच एक होती असे मानले तरी एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की भविष्यात येऊ घातलेल्या साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारी वैज्ञानिक आणि सामाजिक तयारी जगाकडे सध्या नाही. जीवनातील नैसर्गिकता आणि नैसर्गिक जीवनशैली हरवून बसलेल्या लोकांना आणि देशांना ह्या महामारीचा त्रास तीव्रतेने झाला.  विज्ञानाची धुरा वाहणाऱ्या प्रगत देशांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे हे एक गंभीर वास्तव असून, अशा संसर्गजन्य रोगांच्या साथी संपूर्ण विश्वाला, मग ते विकसित देश असो विकसनशील देश असो की अविकसित देश, अगदी काही महिन्यात जेरीस आणून प्रगतीत काही दशके मागे नेऊन टाकू शकतात हे सिद्ध झाले आहे.

  


परस्पर साहाय्याशिवाय ह्या आपदेवर कोणत्याही देशाला विजय मिळवता येणार नाही हे देखील बरेच देश आता समजून चुकले आहे. जगातील वेगवेगळ्या आंतर्राष्ट्रीय संस्था आणि परिषदांना तत्कालप्रभावी सर्वसमावेशकतेचा स्वीकार करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूची ही साथ जगातील सर्व देशांना आत्मश्रेष्ठीच्या धुंदीतून भानावर आणण्यासाठी पुरेशी राहील अशी आशा बाळगूया जेणेकरून भविष्यात वारंवार येऊ घातलेल्या साथीसदृश रोगराईवर आणखी प्रभावी उपाययोजना आणि अंमलबजावणी करता येईल.




टिप्पण्या

  1. खूपच महत्वाचे बोललात तुम्ही एका न दिसणाऱ्या विषाणू ने जगास जेरीस आणले. विकसित देशांना त्यांची जागा दाखवुन दिली, किंबहुना सगळ्या मानव जातीस जागा दाखवुन दिली. परस्पर सहभाग हा खुप महत्वाचा आहे. आत्मनिर्भरता महत्वाची पन त्याहीपेक्षा परस्पर संबंध, सहभाग हा खुप महत्वाचा विषय आहे. मानव विकासाचा कणा आहे तो.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

मनाचा कळफलक