एक छोटीशी पुडी



एक छोटीशी पुडी. परंतु या पुडीची मूर्ती जरी लहान असली तरी कीर्ती मात्र महान आहे. खरं तर लोकांच्या खिशात ही पुडी असते, तरी करोडो लोकांना या पुडीने खिशात घातले आहे. मी कशाबद्दल बोलतोय ह्याची कल्पना एव्हाना तुम्हाला आलीच असेल. होय मी बोलतो आहे त्या गुटख्याच्या पुडीबद्दल. तीच गुटख्याची पुडी जिने गेली काही दशके सामान्य जनतेच्या मनावर राज्य केले आहे. तीच पुडी जिच्या कारनाम्यांनी तद्दन उशीरा का होईना परंतु सरकारांना जाग आली आणि त्यांनी पुडीवर निर्बंध घातले.

ह्या पुडीने भारताची बऱ्यापैकी युवाशक्ती गिळून टाकली आहे. जास्त प्रभाव हा ग्रामीण युवकांवर दिसून येतो. काम असो नसो, गावातील ठरलेल्या मोक्याच्या ठिकाणी या युवकांचे टोळके जमते आणि सर्वात मुख्य आकर्षण असते गुटख्याच्या पुड्या. एक पुडी फोडून अर्धी अर्धी खाल्ली म्हणजे जणू काही शोलेच्या जय-वीरूची मैत्री आहे ह्या आवेशात ही युवा मंडळी वावरतअसते. रोज दोन-तीन रुपयांची पुडी खाणाऱ्याला जर कुणी ५-१० रुपयाला मिळणारी उच्चवर्गीय गुटखा पुडी देऊ केली की त्याला स्वर्ग ठेंगणा होतो. जणू दररोज देशी ढोसणाऱ्या दारुड्याला कुणी इंग्रजी स्कॉचची बाटली भेट द्यावी.


सकाळी सकाळी दूध घ्यायला मी किराणा दुकानात उभा असतांना एक फळांची हातगाडी घेऊन जाणारा इसम थांबला आणि त्याने तब्बल ५० रुपयांच्या गुटखा पुड्या विकत घेतल्या. कुतूहल म्हणून विचारले असता त्याने सांगितले की दिवसभरात फळं विकत असतांना लागतात खायला विरंगुळा म्हणून. दिवसभरात तो कमी अधिक ४०० रुपये कमावतो असेही त्याने सांगितले. तुम्ही कल्पना करा हा माणूस आपले दहा टक्क्यांहून अधिक उत्पन्न गुटखा पुड्यांवर उधळतोय. किती दुर्दैवी आहे हे सगळं जरी यात दैवाचा भाग काहीच नाही. अज्ञान म्हणावे का याला तर नाही. पुडी खाऊन होणाऱ्या दुष्परिणामाची पुरेपूर जाणिव असते ह्या लोकांना. 

अज्ञानाचा विषय निघाला म्हणून एक आणखी विरोधाभास नमूद करतो. शिक्षण क्षेत्रात ह्या पुडीचा प्रादुर्भाव ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट ठरली आहे. ज्या गुरूकडे मुले भविष्याचे मार्गदर्शक म्हणून बघत असतात त्यांनी तोंडात पुड्या ठेवून मुलांना संस्कार आणि नीतीमत्तेचे धडे द्यावे यापेक्षा क्लेशदायक आणखी काय असेल. इतकेच नव्हे काही शिक्षक इतक्या नीच पातळीवर जातात की शाळा सुरु असतांना वर्गातील मुलांच्या हातून पुड्या मागवतात. मग अशा वातावरणात अर्ध्याहून अधिक मुलं पाचवी सहावीत पोहोचेपर्यंत पुड्या खायला सरावून जातात यात मुलांची किती चूक? व्यसनांच्या आहारी जाऊन लहान मुलांच्या भविष्याचा खेळखंडोबा करायला मागे पुढे बघत नाहीत असे शिक्षक जर सर्रास आपल्या शिक्षण व्यवस्थेत खपवून घेतले जात असतील तर देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या बाता मारायला आपल्याकडे तोंड उरतं कुठे?   



एक साधी गुटख्याची पुडी पण किती हैदोस घालून ठेवला आहे तिने.  ह्या पुड्यांचा खरा उच्छाद म्हणजे रस्तोरस्ती पडलेले कपटे. पुड्या खाणारे मोठ्या ऐटीत पुडी तोंडात सोडून अगदी राजरोसपणे रस्त्यांवर कचरा टाकतात. ती इतकी बारकी बारकी कपटी, हवेनी जिकडे तिकडे पसरलेली दिसतात. शहर म्हणा गाव म्हणा आधीच प्लास्टिकच्या कचऱ्याने उच्छाद मांडलेला असतांना ह्या पुड्या त्यात लक्षणीय भर घालत राहतात. ह्या गुटख्याच्या दुर्गंधीने आजूबाजूला असणाऱ्या लोकांना अक्षरश: मळकी सुटते. रेल्वे किंवा बसमध्ये प्रवास करतांना जर चुकून शेजारी एखादा गुटखा बहाद्दर बसलेला असेल तर प्रवास अगदी नकोसा होऊन जातो. आणि ह्या बेशरम, गलिच्छ लोकांना दर पाच पाच मिनिटांनी पचापचा थुंकायचं असतं. इतका आवश्यक आणि प्रिय आहे तुम्हाला तो पदार्थ तर गिळून घ्या ना कशाला थुंकून पैसे वाया घालवताय? तुम्हाला स्वत:च्या जीवाची किंमत नाही आणि बेमौत मरायचं आहे ना मग खुषाल मरा, फक्त इतरांना तुमच्या व्यसनाच्या परिघात ओढू नका. 



सरकारी जाहिराती ओरडून ओरडून सांगतात की तंबाखू खाऊ नका, जीवाला धोका आहे. तंबाखू उत्पादनांवर मोठाली कर्करोग्यांची विचलित करणारी चित्रे छापतात पण त्याने काय होणार आहे. पुडी, बिडी विकत घेणाऱ्याला त्या चित्राशी काहीच सोयरससुतक नसतं. किंबहुना त्याला ते चित्र दिसतही नाही. हे सर्व वरवरचे उपाय झालेत. उपाय करायचे असतील तर जालीम करावे नाहीतर करूच नये.


आता थोडं गुटखाबंदी कडे वळू. हे एक अजब प्रकरण आहे. जी दारूबंदीची गत आहे तीच गुटखाबंदीची. गुटखाबंदीच्या अंमलबजावणीनंतर तुम्हाला दिसून आलेले फरक सांगा असे जर एखाद्या सामान्य नागरिकाला कुणी विचारले तर त्याची गोची होऊन जाईल. कारण चित्रात एकही फरक तुम्हाला काढता येणार नाही. कारण काही बदल झालेलाच नाही. जे गुटखा खातात फक्त त्यांना थोडासा फरक जाणवला तो म्हणजे काळाबाजारीमुळे वधारलेले भाव. पण मागणी आणि पुरवठा यात तसूभर अंतर आलेले नाही. उलट पुरवठा सुधारला आहे. आधी फक्त पानाच्या टपऱ्यांवर मिळणाऱ्या या पुड्या आता तुम्हाला सर्व किरकोळ दुकानात सहज उपलब्ध आहेत. म्हणजेच गुटखाबंदी ही फक्त कागदोपत्री झालेली आहे. आम्ही किती कर्तव्यदक्षतेने अंमलबजावणी करतो हे दाखविण्यासाठी ठरवलेल्या वेळापत्रकानुसार अधूनमधून बातम्या येत राहतात की अमुक अमुक ठिकाणी लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त, विक्रेत्यांवर कारवाई. पण आतापर्यंत एकदाही कुण्या गुटख्याच्या कारखान्यावर बंदी आलेली नाही किंवा त्यातील बड्याबड्या धेंडांना अटक झालेली नाही. यावरून सरकारांची काय मनीषा आहे हे लक्षात येऊन जातं. आणि मी हे महाराष्ट्रापुरत जरी बोलत असेल तरी मला वाटते कुठेही गेलं तरी हीच परिस्थिती असणार.  नुसता राजकीय हेतू ठेवून लोकप्रिय होण्यासाठी घेतलेले असले निर्णय हे कधीच जनतेच्या भल्यासाठी नसतात तर ते फक्त जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी असतात. मुळात सरकारलाच ही उत्पादनं बंद करायची नाही हेच याने सिध्द होतं. 


मला त्या लोकांसाठी अजिबात वाईट वाटत नाही जे व्यसनांच्या आहारी जाऊन स्वत:ची दुर्गती करून घेतात. अगदी तडपून तडपून मेले तरी तसूभर कीव येणार नाही. परंतु मला त्या लोकांची फार फार दया येते जे ह्या व्यसनी लोकांच्या जवळचे असतात. ज्याचं जीवन म्हणजे एक तडजोड होऊन जाते नशिबाशी केलेली. ज्या मुलाचा बाप  त्याच्यासमोर सर्रास पुड्या खातो आणि शिक्षकही पुड्या खातो तो मुलगा स्वतंत्र होताच त्या वाटेने जाणार नाही याची किती टक्के शक्यता आहे?

एवढंच वाटतं मनापासून की येणाऱ्या भविष्यात ही पुडी देशातून हद्दपार झाली पाहिजे. रस्त्यांनी, चौकांनी थोडे मोकळे श्वास घेतले पाहिजे. येणाऱ्या पिढीतले करोडोंच्या संख्येने जे ह्या पुडीला बळी पडणार आहेत ते वाचले पाहिजेत. इतर कोणतीही रोगराई येवो त्यावर लस निघेल औषध निघेल पण अशा ह्या सामाजिक महामारीवर कुठलंच औषध नाही. जर कुणाला काही उपाय सुचत असेल तर नक्की तो करून बघायला पाहिजे. 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा