पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनाचा कळफलक

इमेज
बरेचदा आपण आपल्याही नकळत उदास होऊन जातो. किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर आपली चिडचिड व्हायला लागते. कारण कळत नाही.  किंवा असे म्हणू की त्यावेळी आपण कारण शोधत बसत नाही. आपण फक्त होणाऱ्या गोष्टींवर व्यक्त होत राहतो, प्रतिक्रिया देत राहतो. कधी कधी घरी दूरचित्रवाणीसमोर बसून बातम्या किंवा एखादा कार्यक्रम बघत असतांना मुलांचा गोंधळ चालू होतो. त्यामुळे आपल्याला ऐकण्यात अडथळा येतो. मग हळूहळू चिडचिड व्हायला लागते. असं जर दोन-तीनदा झालं तर आपण मुलांवर ओरडतो किंवा खेकसतोसुद्धा. कधी कधी तर पाठीत दोन धपाटे पण घालून देतो. काही वेळाने किंवा दिवसाअखेरी आपल्याला आपल्या कृतीचं वाईट वाटतं. आपण उगाच रागावलो असं वाटतं आणि तेच बरोबर असतं. हे क्वचित होत असेल तर हरकत नाही. कधी कधी अशी प्रतिक्रिया मुलांना काही बाबतीत मर्यादा घालून देण्यास उपयुक्त ठरते. परंतु हे चित्र जर तुमच्या घरात वारंवार उद्भवत असेल तर मात्र अवलोकन करणे गरजेचे आहे. आपण मनोरंजनासाठी दूरचित्रवाणीसमोर बसतो, कधी कधी सवयीने बसता. परंतु ही क्रिया वरवरची असते. आपल्या मनात मात्र वेगळे विचार, काही प्रश्न किंवा एखाद्या चिंतेचा भुंगा सारखा भुणभुणत असतो.