अज्ञाताचा शोध संवादमाला

माणसाच्या आयुष्यात कधी तरी अशी अवस्था येते जेंव्हा त्याला कशाचा तरी शोध खुणावु लागतो. पण कशाचा? ती वस्तु आहे कि फक्त अनुभुती. ह्या जगातील आहे कि परलोकीय? या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येकाला कितीतरी प्रश्न भेडसावत असतात. अशाच दोन पांथांमधील ह्या शोधाच्या वाटेवर उलगडत घडणारे हे संवाद आपण या सदरातुन बघणार आहोत.

 संवाद पहिला

पहिला पांथ: मी खरंच कशाच्या शोधात आहे? देवाच्या? लहानपणापासुन देवाबद्दल ऐकलय पण त्या संकल्पनेचं मला कधीच आकर्षण वाटलं नाही. ह्याचा काय अर्थ काढायचा? देवाबद्दल माझी जी काही थोडीफार समज किंवा धारणा आहे त्याला सुसंगत असं काही ऐकायला मिळालं तर तिकडं मन आकर्षित होतं? पण मी या मार्गावर का आहे? मी काय शोधत आहे?

दुसरा पांथ: माणुस हा एकच असा प्राणी आहे पृथ्वीवर ज्याच्या अंतरात अज्ञाताचा वेध घेण्याची हि ओढ आहे. आणि प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न उठणं अगदी स्वाभाविक आहे. फक्त कोणाच्या मनात ते थोडे लवकर उठायला लागतात तर कोणाच्या मनात उशीरा. पण हे लवकर उशिरा ह्या आयुष्याच्या नव्हे तर आत्म्याच्या प्रवासाच्या संदर्भात आहे. मला माहित आहे मी आणखी एक गुढ शब्द वापरतोय 'आत्मा'. पण चर्चा पुढे नेण्यासाठी आपण तो वापरूया.

आपण या जगात खुप खुप काळापासुन आहे आणि आपण हा संवाद साधतोय कारण अजुनही आपल्याला हि जन्म मरणाची शृंखला भेदता आली नाही आणि मुक्त होता आलं नाही. तुम्ही पण याबद्दल बरच काही वाचलं असाल म्हणुन मी अगदी थोडक्यात सांगतो. अज्ञाताचा शोध घेण्याची हि खोलवर उर्मी हा याच लांब आणि खडतर प्रवासाचं पर्यावसान आहे.  जसं जसं आपण या मार्गावर पुढे जातो तसतशी हि उर्मी अजुन दात होत जाते आणि एका जन्मात हा शोध संपु शकत नाही त्यामुळे आपण जिथे सोडुन आलो तिथुन पुढच्या जन्मात हा शोध सुरु होतो. सगळे आत्मे हे परम आत्म्यात विलीन होण्यासाठी आतुर असतात. तुम्ही आत्मा म्हणा, देव म्हणा कि परम शक्ती म्हणा. आणि ह्या मिलनाकडे वाटचाल हि फक्त मनुष्य जन्मातच शक्य आहे. इतर प्राण्यांना निसर्गाने फक्त जगण्यापुरती बुद्धी दिली आहे, फक्त मनुष्य प्राण्यालाच जीवनाकडे बघण्याचा तो दृष्टीकोण लाभलेला आहे.

पहिला पांथ: खर सांगायच तर आत्मा , जन्म- म्रुत्युचा फेरा हे माझ्यासाठी फक्त शब्द आहेत, त्यामूळे त्याबद्दल काही जास्त बोलु शकत नाही.

दुसरा पांथ: समाधानाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे शोधत आहे तिथे पोहोचण्यासाठी बरेच मार्ग आहे. ज्याने त्याने आपापल्या योग्यतेनुसार मार्ग निवडायचा असतो. कधी कधी सुरुवातीच्या गोंधळाच्या काळात माणुस ह्या मार्गावरून त्या मार्गावर असा उडया मारत राहतो जोपर्यंत त्याला त्याचा मार्ग निश्चितपणे गवसत नाही. ह्यात काहीच हरकत नाही.

पण तुमचे प्रश्न जर शब्दांचे असतील तर उत्तरात शब्दच येतील. जर तुम्हाला शब्दांमधे आणि त्यांच्या विविधांगी अर्थांमध्ये हरवुन जाण्याची भीती असेल तर ज्ञानमार्ग\ज्ञानयोग तुमच्यासाठी नाही.

थोडे दिवस भक्तीमार्गाने चालून बघा. नाहीतर मग राजयोग किंवा कर्मयोग. आणि याला काही असे बंधन नाही कि एक मार्गच निवडायला हवा. बरेच लोक बराच दूर पर्यंत बहुमार्गी पण असतात.  माझी सध्याची जी अवस्था आहे ती म्हणजे ज्ञानयोगा द्वारे कर्मयोगाकडे वाटचाल करणे.

एक लक्षात असावे, कि आपण फक्त प्रयत्न करू शकतो. अध्यात्माकडे वळलो आहे, दिशा बरोबर असावी असे वाटते आहे. दिशा बरोबर असली कि मुक्कामावर आज ना उदया पोहोचणारच. सिध्दार्थ गौतमाला तब्बल बारा वर्षे लागली आणि कदाचित आणखीही लागु शकली असती जर पुर्वाश्रमीचे संचित नसते. जे. कृष्णमुर्ती सारखा माणुस या जन्मी तरी गोंधळातच गेला. पण पुढच्या जन्मी त्या आत्म्याला ईतकी वाट बघावी लागणार नाही, कदाचित.

पहिला पांथ: मला शब्दांची अडचण नाही, पण काल्पनिक शब्द नकोत. खूप कल्पनेत गेल आयुष्य. सत्य शोधायला निघालोय तर फक्त जे आपल्या दृष्टीने सत्य आहे म्हणजे जे आपल्या अनुभवात आहे त्याचाच आधार घेउया. भक्तिमार्गासाठी एक निरागसता लागते. इतकी जळमट आहेत मनावर कि भक्ती मला शक्य वाटत नाही. खरं तर आपल्यासारख्यांना ज्ञान मार्गच योग्य वाटतो,  जे कि देव समोर आला तर त्याला सुद्धा ओळखपत्र मागतील.

दुसरा पांथ: सगळी गोम इथेच तर आहे. जे पंचेन्द्रियांच्या पलिकडे आहे ते आपणाला काल्पनिक वाटते. पण जे आपण शोधतो आहे ते या विश्वातील नाही. किंवा कमीत कमी पंचेन्द्रियांच्या कक्षेतले नाही. आता सच्चिदानंद हा शब्द बघु. सत+चित+आनंद या सर्व शब्दांचा भाषेतला अर्थ आपल्याला माहित आहे पण अनुभव नाही, प्रचिती नाही. पण आपण(म्हणजे आपला बुध्याहंकार) ठाम असतो कि मला सच्चिदानंद म्हणजे काय हे माहित आहे.

दुसरं उदाहरण, सुख आणि आनंद हे शब्द आपण पर्यायी म्हणुन वापरतो. मराठी भाषेत ते तसेच रूढ झाले आहेत परंतु अध्यात्माच्या शब्दकोशात असं नाही. सुख, दु:ख ह्या भोग भावना आहेत ज्या बाह्य जगाशी संबंधित आहे. आनंद हि आत्म्याची अवस्था आहे, त्याचा स्वभाव आहे. सुख, दु:ख हे आपण मनाने अनुभवत असतो. पण आनंद अनुभवण्यासाठी मनाची गरज नाही किंबहुना मन हेच आनंदात अडसर आहे. ब्रम्हानंदी टाळी लागणे हा वाक्प्रचार त्याच अर्थे योजितात.

ओशोंच्या प्रवचनात तुम्ही ऐकलं असेल. बुद्धांना जेंव्हा विचारलं कि तुम्हाला सत्य सापडलं आहे, आम्हाला सांगा सत्य कसं असतं, काय असतं. बुद्ध म्हणाले, सत्य ते आहे जे सांगितल्या जाऊ शकत नाही. मी जे काही सांगेल किंवा सांगण्याचा प्रयत्न करेल ते माझ्या मुखातुन बाहेर पडल्या पडल्या असत्य होऊन जाईल. कारण ते अजुन तुमच्या अनुभवात नाही. जे तुमच्या अनुभवातच नाही ते तुमच्यासाठी सत्य होऊ शकत नाही.

भिखा बात अगम कि, कहन सुनन कि नाही |
जो जाने वो कहे नही, कहे सो जानत नाही ||

पहिला पांथ: हो, बुद्ध म्हणतात ते जसेच्या तसे पटते. खरय कि सत्य पंचेंद्रियांच्या कक्षेत नाही, पण सत्याचा मार्ग मात्र सुरुवातीला त्या कक्षेतुनच जातो. जे माहित नाही ते शोधायला आपण माहित असलेल्या किवा आपल्या अनुभवात असलेल्या मार्गवरुनच जातो असं माझा अनुभव सांगतो. जेव्हा बरेच दिवस मधे खंड न पडता योग्य आहार, विहार आणि विचार असतो तेव्हा साधा श्वास घेण्यात सुद्दा आनंद अनुभवता येतो. तेव्हा नक्की वाटते की आपला मुळ स्वभाव आनंदमयच असेल. तेव्हा यम, नियम अनुभवात येतात, काल्पनिक रहात नाहित. जेव्हा कधी या मार्गावर खरी शांतता सापडेल तेव्हा ज्या शब्दांना मी काल्पनिक म्हणतो ते पण कदाचित समोर अनुभुती देतील अशी आशा आहे.

दुसरा पांथ: हो ते खरच आहे. पण सुरुवात करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे माहित असणं कि आपल्याला काही माहित नाही. आणि ते स्विकारणं. मला वाटते आपण तेवढं तरी स्विकारलेलं आहे कि ज्ञानेंद्रियांच्या पलिकडे पण काही तरी आहे. आणि आपल्याला कशाचा तरी शोध आहे. आपण इथे जी चर्चा करतोय त्याचा उद्देश्य फक्त मार्गदर्शन एवढाच आहे. कशाचा शोध आहे त्यावर विचार विनिमय. शेवटी सत्य ज्याला त्याला ज्याचं त्याचं शोधायचं आहे.

पहिला पांथ: तेच मला म्हणायचं आहे. ऐकले, वाचले सगळे सोडुन द्यायचे. सध्या जे माहित आहे तिथुन सुरुवात करुया.

दुसरा पांथ: माझं थोडं वेगळ मत पडतं.

कुणी मला विचारलं देव आहे हे तुला माहित आहे का? तर मी म्हणेन नाही. देवावर तुझा विश्वास आहे का? तर मी म्हणेन हो. तसच बाकींच्या गोष्टीचं आहे - जन्म, मृत्यु, आत्मा, मोक्ष.

इतके संत आणि बुद्ध आपल्या संस्कृतीत होऊन गेले आहे त्यांच्या वाणीवर माझा विश्वास आहे. मला सध्या कोणी गुरु नाही पण हे संत साहित्यच तोपर्यंत माझा गुरु आहे. आणि गुरु शिष्याचं नातं हे श्रद्धेवर असतं. तिथे बुद्धीला वाव नाही. गुरुच्या प्रगाढ अनुभवाचा फायदा शिष्याला मिळत असतो आणि व्हायला हवा. नाहीतर त्यांच्या जीवनातील तपस्येला काही अर्थ उरणार नाही. हो शिष्याने आपल्या शंकांचं वारंवार निरसन अवश्य करून घ्यावं. परंतु तिथे सुद्धा एक मर्यादा असते. शिष्याची ती मर्यादा आली कि अज्ञानाची दरी लांघुन जाण्यासाठी गुरु म्हणतो तु आता डोळे मिटुन घे मी तुझा हात पकडुन तुला ही दरी पार करवतो. इथे श्रद्धा महत्वाची. श्रद्धा नसेल, तर तुम्ही हे धाडस करू शकत नाही. संपुर्ण समर्पण नसेल तर गुरु शिष्य नात्यात तुम्हाला प्रवेश नाही. आणि ह्या क्षेत्रात जर तुम्ही बुद्धीला हृदयापेक्षा श्रेष्ठ साथी समजलात तर वाट बिकट आहे. खुद्द बुद्धांनी कितीतरी गुरु केले. सगळे गुरु हरले. खरं म्हणायचं तर बुद्ध वारंवार हरले. शेवटी निराश झाले. आणि पुढची गोष्ट तुम्हाला माहीत आहे.

आता हेच बघा,  अणु, रेणु, जीवाणु, विषाणु आहेत हे विज्ञानाने सिद्ध केलं पण आपण अनुभवलं आहे का?

इतक्या आकाशगंगा आहेत, कृष्ण विवरं आहेत हे विज्ञानाचे तर्क आहेत अजुन सिद्ध व्हायचे आहे पण जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार विश्वास ठेवतोच ना.

पाण्याचा समीकरण  H२O आहे, त्यांनी सांगितलं आपण विश्वास ठेवला. आणि उद्या एखाद्याने खोलवर संशोधन करून जाहीर केलं कि नाही पाण्यात आणखी एक घटक सापडला जो आतापर्यंत आवर्तसारणीत(periodic table) नव्हताच तर तो वैज्ञानिक नोबेल पारितोषिक घेणार आणि आपण विश्वास ठेवणारच. कारण आपण तेवढंच करु शकतो.

सगळं इतकं सोपं सहज असतं तर ७० टक्के पाण्याने बनलेल्या ग्रहावर लोक तहानेने का मरावीत?

जर ह्या सगळ्या बाबतीत आपण विश्वास ठेवु शकतो तर माझं मत आहे कि होऊन गेलेल्या सगळ्या थोर आत्म्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या वाणीचा फायदा आपण घ्यायला हवा. शुन्यातुन सुरु करण्याची खरंच गरज आहे का?

पण शेवटी हे माझं मत आहे आणि ह्या मतावर पोहोचायला मला पण एवढा जीवन प्रवास लागलेला आहे. आणि सत्य किती दुर आहे याची काहीच कल्पना नाही.

पहिला पांथ: देव माहित नाही आणि देवावर विश्वास आहे - म्हणजे काय?

दुसरा पांथ: हे बघा माझ्याकडे दोन प्रश्न आहेत:
    १. देव आहे हे तुम्हाला माहित आहे का?
    २. देवावर तुमचा विश्वास आहे का?

पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे - 'नाही'. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 'हो'.  माहित किंवा अनुभवात असणे आणि विश्वास असणे यातील हा भेद आहे. आणि 'नाही' पासुन तर 'हो' पर्यंतचा हा प्रवास आहे. हे दोन प्रश्न तुम्ही जगातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल विचारू शकता, स्व:ताला किंवा इतरांना. गंमत म्हणजे, जर वरील दोन्ही प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं असेल तर मग प्रवासाची, शोधाची गरजच नाही. आणि जर वरील दोन्ही प्रश्नाचं उत्तर 'हो' असं असेल तरी सुद्धा प्रवासाची गरज उरत नाही कारण तुम्ही मुक्कामावर पोहोचुन चुकलाय. योग घडुन आलाय.

पहिला पांथ: मला शंभर टक्के पटलं तुमचं म्हणणं. पण मला वाटतं "जगात देव आहे का" आणि  "तुमचा देवावर विश्वास आहे का" हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत.

दुसरा पांथ: नाही मला तसं वाटत नाही, निदान माझ्यासाठी दोन्ही एकच आहेत. कदाचित मी व्यक्त करण्यात वापरलेल्या भाषेचा कुठेतरी अडसर असेल. पण "माहित असणं" आणि "विश्वास असणं" ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे ह्यावर तरी आपलं एकमत झालं हे बर झालं.

पहिला पांथ: मी असे समजतो कि, देव आहे ह्यावर विश्वास आहे का म्हणजे देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे का.

देवावर विश्वास आहे का  म्हणजे  देवाच्या अस्तित्वावर आणि त्याच्या कार्यावर जगावर असलेल्या प्रभुत्वावर विश्वास आहे का.

इंग्रजी वाक्य बघु - Believing in god

इथे तुम्ही विश्वासाबद्दल बोलत आहात का? विश्वास आहे म्हणजे काय? तो जे करेल ते चांगलेच करेल? तोच करतो, मी फक्त निमित्त, का अजून काही वेगळेच?

मी आमच्या डॉक्टरांना म्हणायचो की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे . पण काही कठीण प्रसंगी भीती वाटायची. मग मीच त्यांना म्हणायचो की माझा विश्वास खोटा आहे.

इथे इतक्या टोकाला नाही गेलं तरी ९०, ६०, ४० टक्के विश्वास आहे असे म्हणु शकतो आपणं. तसेच विश्वास अनुभवाने हळूहळू वाढु किंवा कमी पण होऊ शकतो.

पण श्रद्धेचं तसं नसावं. ती असते किंवा नसते. ती जन्मजात असेल का? कुठून येत असेल? निर्माण करता येते का?
मी फक्त संतांच्या श्रद्धेलाच श्रद्धा म्हणु शकतो.

दुसरा पांथ: तुम्ही म्हटल्याप्रमाणे विश्वास डळमळीत होतो कधी कधी परंतु मी देवावर विश्वास आहे असं जेंव्हा म्हणतो मग त्याहुन जगात वेगळ काही रहात नाही. मी माझे सर्व कर्म त्याला अर्पण करतो. हो कधी कधी अहंकार डोकं वर काढुन म्हणतो हे मी केलंय वगैरे पण ते नंतर ओसरून जातं. माझा देवावरील विश्वास म्हणजे गीतेतील वचन:

जे झालंय ते चांगलं झालंय
जे होतंय ते चांगलं होतंय
जे होणार आहे ते चांगलं होणार आहे

मी या वचनावर ठाम रहाण्याचा प्रयत्न करीत असतो पण हो परीक्षेचे क्षण येतात, विश्वास डळमळीत होतो पण मग परत मी स्व:ताला सावरतो.

मला मान्य आहे कि विश्वास हा कमी जास्त होऊ शकतो जसा एखादया नात्यातील विश्वास. पण देवावर तुझा विश्वास आहे का या प्रश्नाला माझ्या मते हो किंवा नाही हि दोनच उत्तरं असु शकतात. माझा देवावर ३०% विश्वास आहे, हे उत्तर माझ्या तरी पचनी पडत नाही. मला काही लोक भेटतात जे म्हणतात याच उत्तर माझ्याकडे नाही किंवा आम्हाला काही फरक पडत नाही(I am indifferent) वगैरे. अशा लोकांचं मला काही खरं वाटत नाही.

श्रद्धा वेगळी असते. श्रद्धा म्हणजेच समर्पण. विश्वास म्हणजे समर्पण नव्हे.

जसं कोणतंही ईतर नातं विश्वासावर आधारित असतं तसं गुरु शिष्याचं नातं हे श्रद्धेवर आधारित असतं. श्रद्धा या शब्दाला एकदम समर्पक इंग्रजी शब्द नाही. आणि माझं तर असही मत आहे कि श्रद्धा हा शब्द खुपच मोघम रीत्या वापरला जातो जे खुपच चुकीचं आहे. आता बघा दोन माणसांचं कोणतंही नातं असु दे, मी सांसारिक नात्यांची गोष्ट करतोय, तिथे आपण श्रद्धा हा शब्द कधीच वापरत नाही.

उदा. माझा माझ्या बायकोवर, मुलावर पुर्ण विश्वास आहे.
         माझा माझ्या वडिलांवर पुर्ण विश्वास आहे.

श्रद्धा ही फक्त आध्यात्मिक नात्यांमध्ये असु शकते, आणि जिथे श्रद्धा असते तिथे वरच्या सारखी वाक्य सहसा बोलुन दाखवावी लागत नाही.

मी आणखी एक पाउल पुढे जाऊन म्हणेन श्रद्धेला कोणतंही विशेषण लागु शकत नाही जसं कि पुर्ण, प्रगाढ, अंध वगैरे. ही सगळी विश्वासाला लागणारी विशेषणं आहेत. तुम्ही म्हटलं त्या प्रमाणे श्रद्धा असते किंवा नसते. पण ती जन्मजात वगैरे नसते. ती अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करणारया व्यक्तीलाच उपलब्ध आणि अवगत होऊ शकते. विश्वासाचं आणि बुद्धीचं नातं आहे. पण श्रद्धेत बुद्धीचं काहीच काम नाही. प्रेम आणि भक्ती ही श्रद्धेची रूपं आहेत. राधा-कृष्ण  म्हणजे प्रेम. मीरा-कृष्ण म्हणजे भक्ती. पण दोहोतही समर्पण आहेच.

पहिला पांथ: बर, तुमचा विश्वास आहे आणि मला माहिती नाही देवाबद्दल पण दोघांनाही अनुभव नाही, पण अनुभव मिळावा अशी ओढ नक्कीच आहे त्यामुळे शोध घेण तर भाग आहे. अनेक रस्ते आहेत हे तर खरेच पण आपल्याला खात्रीलायक माहित असलेला मार्ग एकच तो म्हणजे योगाचा.

दुसरा पांथ: शोध तर सुरु झाला आहे बघु भविष्यात हा शोध आपल्याला कुठे घेऊन जातो. योगा मार्ग म्हणजे तुम्ही नक्की कोणता योग म्हणत आहात? भक्तीयोग, राजयोग, कर्मयोग कि ज्ञानयोग?

पहिला पांथ: मार्ग कोणताही असला तरी शेवटी योग आहेच. यातला कोणताही मार्ग निवडला तर यम, नियम, आसन, प्राणायाम या पायऱ्या चढाव्याच लागतात. खरं तर या राजयोगाच्या पायऱ्या आहेत. म्हणून कधी कधी वाटते कि भक्ती, ज्ञान किंवा कर्म योगाला यांची गरज नाही. नसेल का खरंच?

पण कोणत्याही योगासाठी मनाची शांतता आणि स्वस्थता अपरिहार्य असते. आणि शरीर आणि मन एकच आहेत त्यामुळे शरीर स्वास्थ्य पण तेवढेच महत्वाचे आहे. हा माझा अनुभव आहे शरीर आणि मन जेव्हा अतिशय योग्य अवस्थेत असते तेव्हाच या क्षेत्रात पुढे जाणे घडते.

दुसरा पांथ: हो. मला वाटते मन जर स्थिर झालं तर अर्ध स्वास्थ्य सहजच लाभेल. पण मनासमोर आपलं काही चालत नाही. मन आणि बुद्धी मिळुन आपल्या विरुद्ध नेहमी कट रचत असतात. वर्तमानात जगायला जमलं पाहिजे अगदी प्रत्येक क्षण. ओशोंच्या नुसार मन हे नेहमी भूतकाळात आणि भविष्याकाळात उड्या मारतं. वर्तमान म्हणजे मनाचा मृत्यु. त्यामुळे ते तुम्हाला वर्तमानात राहुच देत नाही.

पहिला पांथ: सुर्य मावळतीला आला, आता निघायला हवं. उदया भेटुच नेहमीप्रमाणे आणि बघु उदयाचा दिवस कोणता विषय घेऊन येतो आपल्यासाठी.

[धन्यवाद!]

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

एक छोटीशी पुडी