अंधानुकरणाचा (भि)कारनामा

गरज नसतांना वापरल्या जाणाऱ्या वस्तुंचा किंवा सुविधांचा फायदा कमी आणि तोटाच जास्त होत असतो. हे कळत असले तरी वळत बऱ्याच लोकांना नाही. कोणत्याही गावाचा किंवा शहराचा विकास होत असतांना काही गोष्टी घडत जातात जसे कि रस्ते रुंद होणे, त्यावर दिवे लागणे, सुशोभीकरण, मोठाली दुकानं उघडणे, एकंदरीत सगळीकडे झगमगाट दृष्टीस पडायला लागतो. विकास आणि अर्थव्यवस्था यांचं जवळचं नातं आहे. लोकांची क्रय शक्ती वाढली कि बाजारपेठ मोठी होते आणि त्याला अनुसरून शहराचा ही विकास होत राहतो. शहरात जाहिराती वाढायला लागतात ज्यात लोकांसाठी वेगवेगळी प्रलोभनं असतात. एकावर एक मोफत, २५ टक्के अधिक, १००० रुपयांच्या खरेदीवर एक भेटवस्तु वगैरे वगैरे. आणि लोक ह्या ना त्या प्रकारे प्रलोभनांना बळी पडतातच. वर्षानुवर्षे वापरलेली स्थानिक उत्पादनं सोडुन नामांकित कंपन्यांची उत्पादनं वापरायला सुरु करतात. सोयी सुविधा विकत घेऊन बदल्यात स्वस्थ जीवनशैलीचा परिहार करतात.

मी पण माझ्या शहरात होणारी हि स्थित्यंतरं बघितली आणि अनुभवली आहे. ह्या काळात माणसांमध्ये होणारी मनोस्थित्यंतरं तर खुपच बोलकी, आश्चर्यास्पद आणि कधी कधी अंतर्मुख करणारी असतात. महानगर पालिका असुनही इथे फार काही उद्योग धंदे नसल्यामुळे शहराचा विकास तसा हळुच झाला. जसं सगळीकडे होतं तसच हळु हळु आजुबाजुच्या गावांकडुन शहराकडे लोकांचा ओढा वाढला. जवळपासच्या गावी नोकरी करणारे लोक, शहरात राहुन ये जा करु लागले. घरांची मागणी वाढली म्हणुन मग भुखंडांचे भाव वधारले. भाड्याच्या घरातुन लोक हळुहळु स्वत:च्या घरात राहु लागले. प्रवाशी वाहतुची साधनं सोडुन मग लोकांनी स्वत:ची वाहनं घेतली. मुलं अर्थातच शहरात शिकणार, मग त्यांच्यासाठी पण दुचाकी घेतल्या. हळुहळु वाहतुकीची गर्दी वाढु लागली. ज्या वेगाने वाहनं रस्त्यावर उतरली त्या वेगाने नियम उतरले नाही आणि मग नेमेचि त्यातुन उद्भवणारा त्रास आला. कधीतरी ओघाओघात मग वाहतुकीचे दिवे लागले. ते दिवे समजायला आणि त्यांचे पालन व्हावे म्हणुन वाहतुक पोलीस रुजु व्हायला एक दोन वर्षे गेलीत. एवढं झालं तरी आत्ता आत्ता पर्यंत शहराचं मुख्य वाहन  दुचाकी हेच होतं. छोटंसं शहर, लांबवुन लांबवुन सांगायचा तर दहा किलोमीटरचा व्यास\लांबी आणि पाच किलोमीटरची त्रिज्या\रुंदी. जिथे सायकलच पुरून उरायची तिथे आता मोटार सायकली आल्या एवढंच. पण लोकांकडे एकदा पैसा वाहायला लागला आणि शहरात तो खर्च करण्याची साधनं किंवा बाजारपेठ नसली कि मात्र मग मोठ्या शहरातील लोकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवुन छोटया शहरातील लोकं मोठी होऊ पाहतात आणि तिथल्या गोष्टींचा, संस्कृतीचा,  गरजांचा अंधानुकरण करीत स्वीकार करतात. अंधानुकरण करत असतांना समाजात एक चुक सर्वच गोष्टींच्या बाबतीत होत असते. आपण खोलात न शिरता, शहानिशा न करता वरकरणी सगळ्या गोष्टी उचलतो. गाभा नसलेले फळच जणु, कितीही चावुन चावुन खाल्ले तरी चोथाच पोटात जाणार. असंच एक अंधानुकरण म्हणजे चारचाकीची टूम.अगदी ६-७ वर्ष आधीपर्यंत शहरात फिरतांना रस्त्यांवर मोजक्याच चारचाकी दिसायच्या. पण हि टूम निघाली आणि हा हा म्हणता चारचाकींची संख्या पाचच वर्षात पाच पट झाली. वाढीचा हा दरच या गोष्टीचा पुरावा आहे कि हि गरज म्हणुन झालेली वाढ नव्हे. मागे म्हटल्याप्रमाणे ज्या वेगाने चारचाकी रस्त्यावर उतरल्या त्या वेगाने नियम तर उतरले नाहीच, शिष्टाचार सुद्धा आले नाहीत.  आणि मग अर्थातच त्यातुन उद्भवणारा त्रास इतरांच्या वाट्याला येऊ लागला. या चालकांना इतर सगळी वाहनं दुय्यम वाटू लागली आणि शहरातील सर्व रस्त्यांवर चारचाकींचा अधिकार पहिला या थाटात हे लोक गाड्या हाकु लागले. भोंगे वाजवु वाजवु इतरांना सळो कि पळो करू लागले. घरी वाहन लावण्याची सोय नसल्यामुळे राजरोसपणे घरासमोर रस्त्यांवर गाड्या लावु लागले आणि चाळीस फुटांचे रस्ते बघता बघता २५ फुटी वाटू लागले. गर्दीच्या चौकांमध्ये तर यांनी नाकीनऊ आणले. आधीच मालवाहतुकीची वाहने शहरात धावत असतात तिथे आता दुकानांसमोर या चारचाकींच्या (कि चार पायांच्या?) गिऱ्हाईकांमुळे नाकाबंदी सुरु झाली. शाळेत आपल्या मुलांना सोडायला चारचाकीने येणारे लोक सध्या कमी आहेत म्हटले तरी शाळेचा रस्ता अडवायला हे अपवाद पण पुरेसे ठरतात. एकंदरीत सगळीकडे आनंदी आनंद माजला.मी म्हटल्याप्रमाणे, बरेच लोकांनी एकमेकांच्या देखादेखी चारचाकी घेतल्या. काही बहाद्दरांनी फक्त यासाठी चारचाकी घेण्याची सुबुद्धी दाखवली कि सुलभ मासिक हत्यांवर मिळतात तर हरकत काय. केवळ बक्कळ पैसा आहे म्हणुन वैचारिक तारतम्य न बाळगता वस्तु घेत सुटणे हे तर चुकीचे आहेच परंतु ऐपत बेताचीच असतांना भंपकपणा मिरवायला अशा गोष्टी करणे हे हास्यास्पद आहे. परंतु असे लोक मात्र कमी नाहीत. नवलाईचे नऊ दिवस सरले कि मग ह्यांची चुकलेली गणितं पुढे येतात. हत्ती विकत घेणे आणि हत्ती पोसणे यातला फरक त्यांना कळलेला असतो. काही लोक आपली चुक उमजुन त्यावर व्यवस्थित मार्ग काढतात. जसे कि एका ठिकाणी काम करणारे काही लोक मग एकाच चारचाकीतुन जायला लागतात आणि इंधनाचा खर्च वाटुन घेतात. पण काहिंच्या डोक्यातुन उदयास येतात काही अफलातुन उपाय योजना:

  • काही लोक मग आठवड्यातुन एकदाच चारचाकी बाहेर काढतात. ती पुसपास करून सगळं कुटुंब त्यात बसतं(कसं ते विचारु नका) आणि ते बाहेर जाऊन जेवुन किंवा फेरफटका मारून परत येतात आणि पुन्हा आठवडाभरासाठी चारचाकी भुमिगत होते.
  • काही दररोज काढतात पण फक्त दोन किलोमीटर जाऊन रस्त्यावर आडोशाला गाडी लावतात व तिथुन चुपचाप इतर वाहने पकडुन कामावर जातात जेणेकरून शेजारी पाजारी ईभ्रत कायम राहील.
  • इथपर्यंत तरी ठीक पण काही लोक भाडोत्री गाड्यांसारखे, बस थांब्यावर वगैरे थांबुन प्रवाशी(सवारी) शोधतात आणि आपला इंधनाचा खर्च काढायला बघतात. असं करणं बेशरमपणाचं तर आहेच शिवाय बेकायदेशीर सुद्धा आहे. मी अशा बुध्दी दरिद्री लोकांचा या लेखातुन जाहीर धिक्कार करतो.


पैश्याने खुप गोष्टी विकत घेता येतात पण शहाणपणा नाही. तुम्हाला गरज आहे किंवा तुम्हाला हौस म्हणुन चारचाकी घ्यायची आहे, हरकत नाही पण त्यासाठी पुर्व तयारी सुद्धा करायला हवी.  चारचाकी सोबत येणारे धोके, नियम आणि शिष्टाचार यांचा अभ्यास करायला हवा. उदाहरणार्थ, चारचाकी लावायला घरात पुरेशी जागा आहे हे तरी कमीतकमी बघायला हवं. जेणेकरून तुमची हौस इतरांसाठी डोकेदुखी ठरता कामा नये.

कोणत्याही गोष्टीचं अंधानुकरण नकोच मग ती चांगली का भासेना.  केवळ माझा शेजारी\सहकर्मी हे करतो म्हणुन आपणही तसेच करायचे हे हितावह नव्हे. आपली जीवनशैली हि गरज पुरस्सर असावी, हव्यास\विलास पुरस्सर नव्हे. अंथरूण पाहुन पाय पसरावे हि काही पुस्तकी म्हण नाही. तो जीवनातील सुखांच्या मंत्रांपैकी एक आहे. आधी जाणूनबुजून पाय बाहेर काढायचा व मग माझा पाय उघडा पडतोय असा कांगावा करीत नवीन अंथरूण विकत घेण्यासाठी खटाटोप चालवायचा, हि वृत्ती तुम्हाला फक्त असमाधान आणि दु:खच देऊ शकते. तेंव्हा काहीही निर्णय घेतांना आपली सदसदविवेकबुद्धी जागृत असु दयावी हे महत्त्वाचे.[धन्यवाद!]

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुत्रा पाळताय का?

बेलाची पानं आणि अलुवेरा

चित्रपट समीक्षा - 'सैराट'