बिचारी 'बुलेट'


'बुलेट' ही रुबाबदार गाडी आठवते का तुम्हाला. तुम्ही म्हणाल, म्हणजे काय ती गाडी काय कोणी विसरू शकेल? खरंय! ही गाडी आधी कधी कधीच रस्त्यावर दिसायची आणी दिसली कि तिच्या दिमाखदार आणि डौलदार रपेटीवरून नजर हटायची नाही. तिचा तो भारदस्तपणा आणि इंजिनच्या फायरिंगची भेदकता तुम्हाला जागेवर खिळवुन ठेवण्यास समर्थ होते. तिच्यावरून रपेट मारणारे स्वार पण आधी तश्याच शरीरयष्टीचे असायचे आणि बुलेट आणि तो स्वार हे एकमेकांना पूरक असल्यामुळे बघणाऱ्यावर एक वेगळीच छाप पडत असे. 

पण आजकाल बुलेट चालविणे हि एक फॅशन बनलेली आहे. लोकांकडे बक्कळ पैसा खेळायला लागल्यापासुन उठ सूट कुठल्याही गोष्टीची फॅशन बनायला आता वेळ लागत नाही. आणि त्यामुळेच कधी कधी जे बघाव लागतं ते अगदी विनोदीपासून ते विभत्सपर्यंत काहीही असु शकतं. रस्त्यावरून बुलेट जाणं हि आता नवलाई राहिली नसुन जवळ जवळ डोकेदुखी झालेली आहे. बुलेट बनविऱ्याणे कधी स्वप्नातही विचार केला नसेल कि हि गाडी दररोज कार्यालयात येण्याजाण्यासाठी सुध्दा वापरल्या जाईल. पण आज तुम्ही बघा,  जो नव्हे तो तुम्हाला बुलेट चालवितांना दिसेल. त्यातले अर्धेअधिक चालक तर गाडीला शोभतच नाही. शहरात वाहतुकीच्या एवढया गर्दीत वाहतुक दिव्यावर थांबलेलो असतांना त्या भारी भरकम गाडीचा तोल कसाबसा  सांभाळत एखादा काटकुळा माणुस बाजूला येवुन थांबतो तेंव्हा त्याची नव्हे त्याच्या अकलेची किव येते. आणि एखादा बुलेटवाला  जर का अगदी तुमच्या पुढे थांबला असेल तर मग मात्र डोक्यात शिलक उठते. गाडीच्या धुरकांड्यातुन भयंकर दाबाने निघणाऱ्या त्या हवेच्या माऱ्याला तुम्हाला सामोरं जावं लागतं. पण लोकशाही म्हटलं कि सगळं निमुट सहन करायला लागतं. बोलायची सोय नाही कारण, त्याचे पैसे, त्याची गाडी आणि त्याचीच अक्कल. तो तुमची अक्कल काढल्याशिवाय राहणार नाही.

बुलेट मला सगळ्यात केविलवाणी झालेली तेव्हा वाटते जेंव्हा दिवा हिरवा झाल्यावर बुलेटस्वार अगदी ऐटीत अंगठयानी कळ दाबुन गाडी सुरु करतो. आणि बिचारी ती बुलेट कसनुसा आवाज करत निमुटपणे धडधडायला लागते. दात काढुन घेतलेल्या सर्पासारखी ती भासते. मला आठवतं लहानपणी राजदूत गाडी असायची जिची किक जर उलट आली तर अच्छेकाची वाट लागायची. किक मारतांना स्वाराच्या दमाची आणि आत्मविश्वासाची खात्री पटायची. सरावलेला स्वार मात्र अगदी आरामात ते काम करून जात असे,  ती गाडी त्याला ओळखते याची पावती म्हणा हवं तर. पण आता ना तसल्या दमाचे लोक राहिलेत आणि जे थोडे काही असतील ते पण विचारांनी अशक्तच असल्यामुळे, "कळ दाबुन सुरु होते ना मग कशाला उगाच मेहनत करायची" म्हणत वेळ मारून नेतात.

तुम्हाला हौस आहे, हौस पूर्ण करायला तुमच्याकडे पैसा आहे, पण कदाचित ती हौस जगण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. नाहीतर ज्या बुलेटच्या संगतीत धुंद होऊन मैलोन मैल नुसतीच रपेट मारायची, रस्ते तुडवायचे, स्वातंत्र्याचा उन्मुक्त आस्वाद घ्यायचा त्या बुलेटला शहरातील गर्दीमध्ये चालवतांना ब्रेक, क्लच आणि गेअरचे आचके खायला लावणं आणि तिच्या दर्जेदार अभियांत्रिकीचा असा अपमान करणं  यात मला तरी कोणताही शहाणपणा दिसत नाही.    

                                                                          ===========समाप्त==========
1

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

एक छोटीशी पुडी

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा