मनाचा कळफलक




बरेचदा आपण आपल्याही नकळत उदास होऊन जातो. किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर आपली चिडचिड व्हायला लागते. कारण कळत नाही.  किंवा असे म्हणू की त्यावेळी आपण कारण शोधत बसत नाही. आपण फक्त होणाऱ्या गोष्टींवर व्यक्त होत राहतो, प्रतिक्रिया देत राहतो.

कधी कधी घरी दूरचित्रवाणीसमोर बसून बातम्या किंवा एखादा कार्यक्रम बघत असतांना मुलांचा गोंधळ चालू होतो. त्यामुळे आपल्याला ऐकण्यात अडथळा येतो. मग हळूहळू चिडचिड व्हायला लागते. असं जर दोन-तीनदा झालं तर आपण मुलांवर ओरडतो किंवा खेकसतोसुद्धा. कधी कधी तर पाठीत दोन धपाटे पण घालून देतो. काही वेळाने किंवा दिवसाअखेरी आपल्याला आपल्या कृतीचं वाईट वाटतं. आपण उगाच रागावलो असं वाटतं आणि तेच बरोबर असतं. हे क्वचित होत असेल तर हरकत नाही. कधी कधी अशी प्रतिक्रिया मुलांना काही बाबतीत मर्यादा घालून देण्यास उपयुक्त ठरते. परंतु हे चित्र जर तुमच्या घरात वारंवार उद्भवत असेल तर मात्र अवलोकन करणे गरजेचे आहे.

आपण मनोरंजनासाठी दूरचित्रवाणीसमोर बसतो, कधी कधी सवयीने बसता. परंतु ही क्रिया वरवरची असते. आपल्या मनात मात्र वेगळे विचार, काही प्रश्न किंवा एखाद्या चिंतेचा भुंगा सारखा भुणभुणत असतो. बरेचदा त्या चिंतेपासून सुटका मिळावी या उद्देश्याने दूरचित्रवाणीसमोर आपण येऊन बसतो. खरं तर ही एक पळवाट असते. कारण आपलं मन हे एक अजब रसायन आहे. तेच तुम्हाला पळून येऊन दूरचित्रवाणीसमोर बसायला भाग पाडतं आणि तेच मन स्वत: मात्र ती चिंता चघळत बसतं. डोळ्याने चित्र बघणे, कानाने आवाज ऐकणे सुरूच असते आणि मनात मात्र वेगवेगळे विचार. त्यामुळे ह्या सर्व क्रियांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न आपला मेंदू करत राहतो, त्याच्यावर अतिरिक्त ताण येतो. त्यात मग मुलांनी सुरु केलेला गोंधळ हा दूरचित्रवाणीच्या आवाजातून वेगळा काढण्यासाठी मेंदूची धडपड सुरु होते. मेंदूवरील ताण आपसूक मनात उतरतो आणि या खेचाखेचीचे रुपांतर चिडचिड आणि राग व्यक्त होण्यात होते.  

तुम्ही जर मनोरंजनासाठी किंवा ज्ञानवर्धनासाठी दूरचित्रवाणीसमोर बसणार असाल तर, आधी करत असलेल्या कामातून संपूर्णपणे बाहेर पडता आलं पाहिजे. शरीर दूरचित्रवाणीसमोर घेऊन येण्याआधी मनाला आज्ञा देता आली पाहिजे की सगळ्या उघड्या फाईल्स बंद कर.  मेंदूची रॅम(RAM) पूर्ण रिकामी कर. मनोरंजनासाठी तयार हो. ह्यासाठी लागणारा वेळ तुम्ही मनाला देणे खूप गरजेचं आहे. तुमचं काम बंद करून, आवरून झालं की पाच मिनिट शांत डोळे मिटून बसा. मनातील विचारांकडे लक्ष द्या. अनावश्यक विचार हद्दपार करा. विचार फार हट्टी असतात. ते तुमचं ऐकणार नाही. पण तुम्ही मनाचे स्वामी आहात हे वारंवार स्वत:ला बजावत रहा. एखादं निखळ विनोदाचं पुस्तक आजूबाजूला पडलेलं असू द्या. व्हाटस्ऍप सारख्या माध्यमांच्या शरणात जाऊ नका कारण ही माध्यमे तुम्हाला नियंत्रित करतात. तुम्ही एका निखळ विनोदाच्या शोधात व्हाटस्ऍप च्या  शरणात जाता आणि हिंसा, अपघात, क्रूरता, अश्लाघ्यतेच्या एकावर चार मोफत पोस्ट तुमच्या वाट्याला येणार असतील तर मूळ उद्देशावरच पाणी फिरणार.  

एकदा तुमचं मन मनोरंजनासाठी पूर्ण तयार झालं की मग मुलांनी केलेल्या गलक्याने तुमची फार चिडचिड होणार नाही. मुलांचे खेळ त्यांचा वावर हेदेखील आपल्या मनासाठी रंजनच असायला हवं नाही का. मग त्यांच्या खेळण्याने राग येत असेल तर आधी तुम्हाला स्वत:ला तपासून बघण्याची गरज आहे. 


संगणक वापरतांना कधी कधी कळफलकावरील एखादी कळ सोडल्यानंतरसुद्धा दबलेली राहते व मग ते अक्षर वारंवार उमटत राहते किंवा एखादा तीव्र पट्टीतला आवाज वारंवार येत राहतो. काय झालं काही कळत नाही. आपण सैरभर होऊन शोधत राहतो. आणि हळूहळू मनात वैताग उत्पन्न होतो. 

वेगवेगळ्या माणसांची अशा परिस्थितीत वेगवेगळी प्रतिक्रिया राहू शकते. काही लोकांना कळ अडकून राहू शकते हेच माहिती नसते. त्यामुळे ते अडकलेली कळ कधी शोधूच शकत नाही. परंतु कळफलक वापराच्या सरावाने आपण अडकलेली कळ लवकर शोधून काढतो व ती मोकळी करतो. त्यामुळे पुढची होणारी चिडचिड टळते. त्याचप्रमाणे माणसाचे मन हे सुद्धा एखाद्या कळफलकासारखे आहे. दिवसभरातून काम करतांना लोकांशी बोलणे चालणे होते. ह्यात आपल्या मनाच्या वेगवेगळ्या कळा दाबल्या जातात. संवाद कोणताही वा कसाही असो कळा ह्या दाबल्या जाणारच. समोरचा तुमच्या काही कळा दाबतो तुम्ही समोरच्याच्या कळा दाबत असता. आणि आपण स्वत: म्हणजेच आपलं मन देखील स्वत:च्या कितीतरी कळा सतत दाबत असतो फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की कुठलीही एक कळ  तुमच्या नकळत अटकून राहता कामा नये.

कधी कधी संगणकावर खूप वेगवेगळी कामे एकाच वेळी करण्याच्या नादात आपल्याकडून वेगवेगळ्या कळा इतक्या वेगावेगात आणि वारंवार दाबल्या जातात की संगणक गोंधळून (hang होऊन) जातो आणि मग ईच्छित एकही काम पूर्ण होत नाही. अशा वेळी आपण संगणकाला reboot करण्यासाठी Alt + Ctrl + Del हे कळीचे समीकरण वापरतो. तसेच कधी कधी जेंव्हा आपण चिंतेत असतो, मनात वेगवेगळे विचार सुरु असतात आणि अशातच काही आणखी मनाविरुद्ध घडून जातं आणखी काही कळा दाबल्या जातात, मन सुन्न होऊन जातं. काहीच काम सुचत नाही. तसेच मनावर आलेला हा ताण कमी करण्यासाठीही आपण मनाला reboot करणे गरजेचे आहे:
  • हातची सगळी कामे सोडून द्यावी. 
  • आहे त्या ठिकाणावरून थोडे बाहेर पडून फिरून यावे. 
  • शक्य असल्यास निसर्गाच्या सानिध्यात जावे. 
  • किंवा मस्त एक उकळत्या चहाचा कप घेऊन गच्चीवर, बाल्कनीत किंवा खिडकीत उभे रहावे. 
  • बऱ्याच दिवसांत न ऐकलेलं एखादं आवडतं गाणं, गझल ऐकावी, गुणगुणावी. 
  • तुम्ही चित्र काढत असाल तर सध्या चालू असलेल्या चित्रावर काही रंग चढवावे.  
  • फोटो काढत असाल तर काही क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करावा. 

एकूणच काय की मनाला काही वेळ संपूर्ण निवांतपणा द्यावा. थोडा तजेला, थोडी हुशारी आली की पुन्हा आपल्या कामाकडे वळावं. परंतु शक्य असल्यास एका वेळी फक्त एकच काम करावं. जरी सवयीमुळे काही कामे आपण एकाचवेळी यांत्रिकपणे करू शकत असू तरीही आपण यंत्र नाही आणि आपल्या मेंदूवर आणि पर्यायाने मनावर त्याचा अतिरिक्त ताण पडतो हे लक्षात ठेवावं.  

मित्रांनो शेवटी पुन्हा एकदा हेच सांगेन की मनाच्या कळा ह्या कळत नकळत दाबल्या जात असतात. फक्त एवढे लक्षात ठेवा कि कोणतीही कळ दाबलेली राहू नये. कधीही जर उगाचच अस्वस्थ किंवा निराश व्हायला होत असेल किंवा इतरांवर चिडचिड होत असेल तर लगेच, थोडा निवांतपणा शोधा आणि त्या निवांतपणात आपल्या मनाचा कळफलक एकदा तपासून बघा. एखादी कळ वारंवार अटकत असली तर ती लवकर बदलून घ्या. किंवा शक्य असल्यास तिचा वापर टाळा. पर्यायी कळ शोधा. असतात अशा पर्यायी कळा कळफलकावर - संगणकाच्या आणि मनाच्याही.
 

टिप्पण्या

  1. Wonderful writing, excellently described the art of living with the help of real life examples.. kudos to your command on language.

    उत्तर द्याहटवा
  2. अगदी नेमक्या शब्दात मनाचे विश्लेषण केले आहे आणि योग्य तोडगे सुद्धा सुचविलेले आहे. खूप छान .. मिलींद बाविस्कर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा