कुत्रा पाळताय का?


एक इमानदार पाळीव प्राणी अशी कुत्रा ह्या प्राण्याशी आपली ओळख आहे. आम्हाला आमचा खंड्या म्हणुन एक सुंदर धडा होता तिसरीत कि चवथीत. लहानपणी कुत्रा पाळण्याची हौस पण होती. पण घरच्यांनी पाळू दिला नाही. फार हट्ट केल्यावर मोहल्ल्यातील कुत्र्यांना खाऊ पिऊ घालणे त्यांचे लाड करणे इतपर्यंत मला सुट मिळाली पण पाळायला कधीच परवानगी मिळाली नाही.  तेंव्हा मला त्या गोष्टीचा फार राग येत असे पण मोठा झाल्यावर कळायला लागलं की कुत्रा पाळणं हे वाटते तितकं सोपं प्रकरण नाही. आणि मग हळुहळु आकर्षण पण कमी झालं. गावाकडे मोजक्या ३-४ घरी कुत्रा पाळलेला असायचा आणि त्याचं कारणही असायचं. एक तर तो मालकासोबत शेतावर सोकारीला(राखणीला) जायचा. किंवा गुरंढोरं, शेळ्यामेंढ्या चारायला गुराख्याला \ मालकाला मदत करायचा. पण सहज म्हणून कुत्रा पाळलेला असं क्वचित दिसायचं. गल्ल्याबोळात मात्र कुत्री असायची, गावातील वातावरणाचा ती एक अविभाज्य भाग होती.

हळुहळु प्रगती झाली, शहरीकरणाने वेग घेतला, प्रसार माध्यम आली. जग जवळ आलं. जसं इतर बाबतीत होत आलय तसंच विदेशातील घरात प्राणी, विशेषतः कुत्रे, मांजरे पाळण्याची संस्कृती हळुहळु मोठ्या शहरात शिरली आणि चांगलीच फोफावली. तुम्हाला आठवत असेल तर ६०-७० च्या दशकात चित्रपटातून नायिका गोंडस कुत्र्यांना आणि मांजरांना उचलून फिरतांना दाखवत असत. सुरुवातीला ती श्रीमंत लोकांची मक्तेदारी होती नंतर उच्च मध्यम आणि मध्यम वर्गीय घरात ती शिरली. मोठ्या शहरातून मग छोटया शहरात आणि गावात पण शिरली. पण श्रीमंतीचं प्रदर्शन म्हणून आलेली ही गोष्ट नंतर प्रचलित होऊन गेली. गोंडसपणा हा बायकी गुण म्हणून मग पुरुषांनी राकट जातीची विदेशी कुत्री आयात केली व नंतर भारतात सर्व प्रकारची विदेशी कुत्री प्रजोत्पादित व्हायला लागली. मांजरी त्या मानाने बऱ्याच मागे पडल्या कारण त्यांचे नखरे जास्त आणि त्यात त्यांचा भरवसा पण कमी. जिथे खायची प्यायची मिजास त्या घरी त्या तळ ठोकतात.  शहरांची जनसंख्या फोफावली तशी कुत्र्यांची मागणी वाढली. मग त्यांचे डॉक्टर, त्यांचे खाद्य, इतर वस्तु या सगळ्यांची बाजारपेठ उभी राहिली.

युरोप आणि अमेरिकेत प्राणी पाळणं हि एक सामान्य गोष्ट आहे. त्याचे मुख्य कारण हे सोबत शोधणे आहे. सुरक्षा वगैरे साठी तिथे कुत्री मांजरे पाळली जात नाही. तिथे घराघरात बंदुक असते. आणि तिथे प्राणी हा घरातील खरा खरा सदस्य असतो. त्याला संपुर्ण घरात मुक्त वावर असतो. त्याला हवं नको सगळं बघितलं जातं. तिथले कायदे पण प्राण्यांना सुरक्षा कवच पुरवतात. प्रगत देशांमध्ये सगळ्या सोयी सुविधा असतात. नसतात ती फक्त माणसं. तिथल्या सामाजिक संस्कृतीमुळे घरात फार फार तर दोघं तिघं असतात. कारण सज्ञान होताच मुले घरावेगळी रहायला लागतात. बहुतेक घरात दोन व्यक्ती आणि बऱ्याच घरात एकल पालक बघायला मिळतात. अशा ठिकाणी ह्या प्राणी मात्रांचा खरच आधार जाणवतो. पण भारतात जेंव्हा प्रगत देशातून कोणती गोष्ट आणली जाते किंवा तिची नक्कल केली जाते तेंव्हा त्यातला दिखाऊ पणा तेवढा उचलून इतर गोष्टींचा विचार केल्या जात नाही. त्यामुळे मग अर्धवट ज्ञान आणि अर्धवट व्यवस्थेमुळे बरेच प्रश्न उभे राहतात. बऱ्याच लोकांना कुत्रा पाळण्याचे तोटे नंतर कळायला लागतात जेंव्हा उशीर होऊन जातो.


मी बरेचदा भली मोठाली कुत्री आणि त्यांचे मालक फिरतांना बघितले. कुत्रा मालकाला चक्क ओढत नेत असतो. मालक कोण हे कळत नाही. एक १६-१७ वर्षाची मुलगी एका थोराड शेफर्डला फिरवत असतांना त्याला धावायची हुक्की आली आणि त्याच्या हिसक्याने ही मुलगी रस्त्यावर जोरात आदळली. कदाचित सराव नसाल्यामुळे ती बेसावध होती. विदेशात आणि भारतात काही महानगरात आता स्वच्छता व्यवस्था कडक आहे पण छोटया शहरांमध्ये तुम्हाला ही कुत्री फिरवणारी माणसं दिसतील तेंव्हा तुम्ही त्यांचं निरक्षण केलं तर तुम्हाला अलबत दिसेल की कुत्र्याचा मालक हा कुत्र्याला फिरवायला आपल्या घरापासून थोडं लांब नेतो. कुत्रा आपला नैसर्गिक विधी आटोपून मोकळा झाला की मालकाला हुश्श होतं. पण ही घाण तिथे तशीच सोडून घर मालक कुत्र्याला घेऊन घराकडे जातो. इतर ठिकाणी हा गुन्हा ठरतो. कुत्री फिरवतांना तुम्हाला खिशात नेहमी विष्ठा उचलण्यासाठी पिशवी ठेवणे आवश्यक आहे. शहरात मोकळी जागा अशी किती सापडणार? म्हणजे ही घाण कोणाच्या ना कोणाच्या घराच्या आसपास किंवा सार्वजनिक ठिकाणी केली जाते. आणि हा नित्यक्रम आहे. विचार करा तुमच्या घराच्या आसपास जर अशी दहा-पंधरा बेजबाबदार माणसं(कुत्र्यांची इथे काहीही चूक नाही) असतील तर ती परिसर किती प्रदुषित करू शकतात.

काही संकुचित विचार करणारी माणसं ही प्राणी प्रेमापोटी नव्हे तर आपल्या क्षुल्लक दंभासाठी, स्वार्थासाठी प्राण्यांचा उपयोग करून घेतात. दुरून चंगळ दिसत असली तरी पाळलेल्या ह्या प्राण्याचं जीवन खरच दयनीय असू शकतं. आणलेल्या नर कुत्र्याला आधी नपुंसक बनवल्या जातं. कुत्री असेल तर गर्भाशय काढून टाकणं किंवा तत्सम शस्त्रक्रिया केली जाते. कारण तिचं बाळंतपण करण्यात यांना अर्थातच रस नसतो. नैसर्गिक कामवासनेचं दमन होऊन पुढे काही प्राण्यांमध्ये मानसिक आजार निर्माण होतात. जसे कि चिडखोरपणा, अति-आक्रमकता. कुत्रा घरी आणतांना केलेली घाई ही नडू शकते कारण हौशी लोकांना अशा परिस्थितीत काय करावं हे माहित नसतं. चांगले प्राणीतज्ञ न सापडणं ही पण छोटया शहरात एक समस्या आहे. अशावेळी आपण ह्या प्राण्याच्या जीवाशीच खेळ करत आहे ह्याचे भान ठेवायला हवे. जेंव्हा एखादा पाळलेला कुत्रा एखादया रोगाने त्रस्त होतो किंवा पिसाळतो तेंव्हा त्याला दुर कुठेतरी नेऊन सोडून देतात. त्या प्राण्याप्रती दाखवलेली क्रूरता ही एक बाब आणि त्या प्राण्यामुळे इतरांना उद्भवणारा धोका हि दुसरी बाब. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली तुम्हाला जाणवत असेल. यात बरीचशी कुत्री ही लोकांनी सोडून दिलेली असतात. त्या कुत्र्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती बघितल्यावरच कळतं की ही सगळी काही स्थानिक कुत्री नाही.  गाड्यांमागे धावत सुटणारी कुत्री, मुलांना जखमी करणारी आणि कधी कधी जीव घेणारी कुत्री. जिकडं तिकडं घाण करणारी कुत्री बघितली कि ह्यात आपल्याच समाजातील काही प्राणीप्रेमी माणसांचाही हातभार आहे हे विसरू नये.



काही लोक कुत्री घरात आणली की माणसांपासून दूर जातात. वेगवेगळ्या कारणांनी.  घराबाहेर पडण्यावर मर्यादा येतात. घरमालकाच्या नावापेक्षा मोठाले कुत्र्यापासून सावधान असे फलक दारावर झळकु लागतात. क्वचित आलेल्यांच्या अंगावर कुत्रा धावून जाणे किंवा चावा घेणे असे प्रकार सुद्धा घडत असतात. साहजिकच अशा घरी जातांना थोडी पंचाईत होते. घरात गेलो तरी प्राण्याच्या वावरामुळे घरात एक विशिष्ट वास भरून राहतो जो घरच्यांना जाणवत नाही पण पाहुण्यांना असुविधा होते. कुत्रा वेळी अवेळी भुंकत राहत असेल किंवा आसपास घाण करत असेल तर शेजाऱ्यांना त्रास उद्भवतो. त्यांनी बोलून दाखवलं की मग त्यांच्या सोबत पण दुरावा वाढतो. अशी इतरही काही कारणं असू शकतात.

कधी कधी पालक आपल्या मुलांच्या हट्टाला बळी पडतात आणि कुत्रा पाळायला परवानगी देतात. पण काही कारणास्तव अधुनमधुन किंवा शिकायला किंवा लग्न होऊन ही मुले घराबाहेर गेली की सगळी जबाबदारी पालकांवर येऊन पडते. ती पेलण्याची त्यांची तयारी नसते, इच्छा नसते आणि कधी कधी वयही नसतं. अशा वेळी हा त्यांच्यावर आणि त्या प्राण्यावर एक प्रकारचा अन्याय आहे. अतिरेक नाही पण ऐकून एक दोन उदाहरणं अशी पण आहेत की घरातील वृद्धांना हात धरुन फिरवायला न्यायची ज्यांना लाज वाटते किंवा तिथे जे वेळेचा बहाणा करतात असे लोक कुत्र्याची साखळी सांभाळत मोठ्या तोऱ्यात रस्त्यांवर तास तासभर हिंडत असतात. काही लोकांना वृद्धांच्या औषधपाण्याचा खर्च जड जातो आणि आपली व्यथा ती शेजारी पाजारी बोलून दाखवत असतात. पण प्राण्यांचे महागडे खाद्यपदार्थ, औषधं, लसी मात्र यांच्या अर्थसंकल्पात चपखल बसतात. असे विरोधाभास नजरेस पडले की वाटतं, का त्या वृद्धांना वाटू नये की ह्यापेक्षा कुत्र्याचा जन्म परवडला. ही खरच शोकांतिका आहे.

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजकाल शहरात सुद्धा घरात माणसं कमी असतात. एकलकोंडे पणा वाढत आहे अशा वेळी लोक मग प्राण्यांचा आधार घेतात. प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. कोणाला विरंगुळा म्हणून, कोणाला सुरक्षा म्हणून तर कोणाला इतरांकडे आहे म्हणून घरी पाळीव प्राणी हवा असतो. गरज असल्यास प्राणी पाळण्यास हरकत नसते. परंतु खालील गोष्टींचा विचार करून मग निर्णय घ्यावा:

१. कुत्रा, मांजर घरी आणणं हे बाळ घरी आणण्या एवढंच मोठं काम आहे.
२. त्यांच्या संगोपनाचा खर्च तुमच्या अपेक्षेपेक्षा फार मोठा असू शकतो.
३. चांगला पशुतज्ञ जवळपास असणे आवश्यक असतं.
४. प्राण्यांचे काही रोग घरच्यांना त्रासदायक किंवा संसर्गजन्य ठरू शकतात.
५. त्यांना प्रशिक्षण देणं हे वेळखाऊ आणि जिकिरीचं काम आहे.
६. तुमच्या वागण्या, फिरण्यावर येणारी बंधनं ओळखावी.
७. स्वच्छतेची कामं दुपटीने वाढणार हे जाणून असावे.
८. घरातील सगळ्याची ह्या निर्णयात रजामंदी असावी.
९. इतरांना त्रास होऊ नये, परिसर अस्वच्छ होऊ नये याची काळजी घेणे खूप आवश्यक.
१०. शेवटचं आणि महत्वाचं, आपण माणसांपासून दुरावत नाही ना हे नक्की तपासून बघावं.

तेंव्हा जर तुम्ही घरात पाळीव प्राणी आणला असेल किंवा भविष्यात कधी आणणार असाल तेंव्हा त्या निर्णयाकडे एक मोठा निर्णय म्हणून बघा आणि वर नमुद केल्याप्रमाणे सर्वंकष विचार करूनच तो निर्णय घ्या.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

एक छोटीशी पुडी