पुस्तक समीक्षा - उधाण वारा



नुकतंच तस्लीमा नासरिन यांचं विलास गीते अनुवादित उधाणवारा(उतोल हवा) हे पुस्तक वाचलं. ४५८ पृष्ठांचं हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी २०१० साली प्रकाशित केले आहे. बरेच दिवसांपासून नासरिन यांचं लिखाण वाचायचं होतं पण ते येनकेनकारणे मागे पडत राहिलं. हा त्यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग. पहिला भाग आहे माझं कुंवारपण(आमार मेयेबेला). पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की आधी पहिला भाग वाचायला हवा होता. खूप सुंदर शैली आहे वृत्तांत कथनाची, साधी सरळ आणि रोखठोक. अगदी पारदर्शी आणि प्रामाणिकपणे स्वत:चं जीवन जगापुढे उलगडून ठेवण्यासाठी, ते सुद्धा अशा प्रदेशात जिथे धर्मव्यवस्था ही इतर सगळ्या व्यवस्थांच्या वरचढ आहे, एक निधडं काळीज लागतं. त्या निडरतेला वारंवार सलाम करावासा वाटत राहतो.


पुस्तक हे ज्या भाषेतलं त्या भाषेत वाचण्यात एक वेगळीच मजा असते, तो थेट लेखकाशी साधलेला संवाद असतो, अर्थातच ते नेहमी शक्य नसल्यामुळे अनुवादक आपल्यासाठी देवदूत ठरतात. नासरिन यांचं लिखाण बंगालीमधे आहे आणि त्या सुप्रसिद्ध असल्यामुळे अनुवादाचे तिन्ही पर्याय उपलब्ध होते- मराठी, हिंदी आणि इंग्रजी. अलिकडे अलिकडे खूप सुंदर मराठी अनुवादित पुस्तके वाचण्यात आली म्हणून मग मराठीची निवड केली आणि विलास गीते यांनी ती सार्थ ठरविली. कुठेही असं वाटलं नाही की शब्द ओढूनताणून बसविले आहेत. वाटतं लेखिका आपल्याला स्वत: तिची गोष्ट सांगते आहे. काही गोष्टींच्या मूळ नावांमध्ये बदल केलेले फक्त जाणवतात.


आपला शेजारी बांग्लादेशातील गोष्ट असल्यामुळे लिखाणात आलेलं लोकजीवन साधर्म्य आपल्याला जवळचं वाटत राहतं. समाजातील स्त्रियांचं दुय्यम स्थान आणि त्यांच्या पदोपदी होणाऱ्या कुचंबणा, लहान वयापासूनच मुलांमधे बोकाळलेली गुन्हेगारी आणि त्याला लहान वयापासूनच बळी पडणाऱ्या मुली हे सगळं चित्रण व्यथित करून जातं. आणि अशा समाजव्यवस्थेशी पदोपदी खंबीरपणे दोन हात करणारी लेखिका मनात आदर निर्माण करते. बंगाली माणसाच्या रक्तात असलेली साहित्य निर्मितीची उर्मी आणि त्यासाठीचा युवावर्गातील अट्टहास आश्चर्यचकित करून जातो. त्यानिमित्ताने पुस्तकात आलेल्या युवा कविता प्रभावशाली आणि बंडखोर आहेत. वाटतं आपला प्रदेश त्या बाबतीत किती कोरडा आणि अलिप्त आहे.


पुस्तकाची विभागणी छोट्या छोट्या प्रकरणामधे केलेली असल्यामुळे वाचकाला विश्रांतीसाठी सोईचं ठरतं.  हे पुस्तक निव्वळ मनोरंजन शोधणाऱ्यांसाठी नसून प्रगल्भ वाचकांसाठी आहे जे जीवनातील सत्यचित्रणाची विदारकता सहन करू शकतील. नासरिन यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग वाचण्याची आता उत्सुकता लागलेली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

एक छोटीशी पुडी