स्त्री मुक्ती कि स्त्रीत्वा पासुन मुक्ती?


सध्या समाजात स्त्री मुक्तीच्या नावाखाली जे काही चालू आहे ते बघता स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय हा प्रश्न परत परत पडायला लागतो? आणि तो पडायला पण हवा. स्त्रीने घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडणं कळतं. चुल आणि मुल ही चौकट नाकारणं हे पण कळतं. आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होऊन संसाराला हातभार लावणं पण कळतं. ह्या सगळ्या गोष्टी स्त्री मुक्ती किंवा स्त्री पुरुष समानता अंतर्गत ग्राह्य आहेत. सगळ्या गोष्टींचा समतोल राखुन स्त्री जेंव्हा प्रगती करते तेंव्हा त्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी ती अभिमानाची बाब ठरते. सदर लेखाचे प्रयोजन त्या स्त्रियांसाठी आणि कुटुंबासाठी नव्हे. आणि महत्वाचे म्हणजे पुरुष श्रेष्ठीचा पुरस्कार करण्यासाठी तर नव्हेच नव्हे. ते लेख वाचुन तुम्हाला कळेलच. पण हे प्रस्तावनेतच सांगणे गरजेचे आहे जेणेकरून 'त' वरून ताकभात समजुन वाचकांनी लेख वाचायचे टाळू नये. झटपट निवाडा देण्याची मानसिकता या धकाधकीच्या जगात मानवाला मिळालेली देण आहे. असो.

स्त्री मुक्ती या सबबीखाली आचरणात येणाऱ्या बऱ्याच गोष्टी आता प्रश्नचिन्हे निर्माण करतांना दिसत आहेत. स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय आणि स्त्रीने केलेल्या कोणकोणत्या गोष्टींचा त्यात अंतर्भाव होतो?
  • नोकरीसाठी घराबाहेर पडुन बाहेरचच होऊन जाणं आणि घरातील आपल्या कामांसाठी इतर स्त्रियांना ठेवणं हि स्त्री मुक्ती का? 
  • घरी कामाला असलेल्या स्त्रीला व्यवस्थित काम करत नाही म्हणून बोलणं, मारणं हि स्त्री मुक्ती का? 
  • प्रसव वेदना नकोत म्हणून पोट फाडून मुलाला जगात आणणं हि स्त्री मुक्ती कि स्तनांचा आकार बिघडू नये म्हणून मुलाला अंगावर न पाजणं हि स्त्री मुक्ती? 
  • खटकणारे, उत्तेजक पेहराव करणं हि स्त्री मुक्ती कि स्त्री पुरुष समानता दर्शविण्यासाठी ओढून ताणुन पुरुषी पेहराव करणं हि स्त्री मुक्ती? 
  • महिन्याला किलोभर सौंदर्य प्रसाधनं वापरुन गोरं दिसण्याची केविलवाणी धडपड हि स्त्री मुक्ती कि आपण कमावतो म्हणुन वेळापत्रक आखुन न चुकता खरेदीला जाणं हि स्त्री मुक्ती? 
  • दारूच्या दुकानात किंवा विडी ओढतांना आता दिसायला लागलेली स्त्री हिच ती मुक्त झालेली स्त्री होय का? 

या सर्व प्रश्नांची उत्तरं स्त्रियांनीच नव्हे तर पूर्ण समाजाने अंतर्मुख होऊन शोधण्याची आवश्यकता भासत आहे.
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावुन जगात वावरणाऱ्या स्त्रीचं कौतुक आहे पण तसे करत असतांना मुलभूत कर्तव्यांकडे पाठ फिरवणं याला नक्कीच स्त्री ची समाज जीवनातील अधोगती म्हणावी लागेल. स्त्री मुक्तीचं उद्दिष्ट कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. फक्त आर्थिक उदारीकरण एवढ्यापुरती स्त्री मुक्तीची व्याख्या आवळून जातांना सध्या दिसते आहे.



गृहकृत्यदक्ष बाई म्हणजे यांच्या मते अबला नारी. बाईने घराबाहेरच पडायलाच हवं आणि गरज असो नसो पैसा कमावुन आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हायलाच हवं असा अनाठायी अट्टाहास या भरकटलेल्या स्त्री मुक्तीवादी लोकांमधे आढळतो. सर्व बाबतीत स्त्री पुरुष समानता किंवा स्त्री सबलीकरणाबाबत जागरूक असणारी हि स्त्री म्हणजेच मुलगी, लग्न ठरतं तेंव्हा मात्र या सगळ्या तात्विकतेला फाटा देऊन मुलगा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला हवा, जास्त कमावणारा हवा, महानगरातच स्थायिक हवा अशा सबबी आड करून स्थळे नाकारतात तेंव्हा यांचा मुखवटा गळुन पडतो आणि समोर येते ती एक स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्ती. पुढे पुढे नवऱ्याला घरातली चार कामं करायला लावणं हे साध्य, आणि त्यातल्या त्यात जर स्वयंपाकघरात सुद्धा नवऱ्याला राबवता आलं तर अशा 'मुक्त' स्त्रीचं भिशी पार्ट्यांमध्ये मुक्त कंठाने कौतुक होतं.

जी स्त्री आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आहे आणि आपलं घर चालविण्यास सक्षम आहे तिच्या नवऱ्याने घरी बसुन आरामात मुलं सांभाळली तर काय वाईट आहे. पण नाही तसं होत नाही. कोणत्याच स्त्रीला हे पटणार नाही. का?

घटस्फोट झाला कि पुरुषानेच स्त्रीला पोटगी दयायची, त्याच्या मालमत्तेवर हक्क सांगायचा मग ती माहेरची कितीही श्रीमंत असो. असे का?
स्त्री पुरुष समानता कुठे गेली?
तुमचा स्वाभिमान कुठे गेला?




चित्रपट, जाहिरातीतुन घराघरात पोचणाऱ्या नग्न स्त्रिया यांच्या मर्यादेत बसतात, त्याबद्दल कोणी खंत व्यक्त करीत नाही किंवा कोणती स्त्री मुक्ती संघटना काही करीत नाही. पण तेच जर का कोणी एखाद्या घटनेच्या अनुषंगाने स्त्रियांच्या पेहरावावर आक्षेप घेतला आणि बाहेर वावरतांना थोडे सभ्य कपडे घाला असं सुचवलं तर मात्र यांच्या मुक्तीवर, स्वातंत्र्यावर घाला पडतो, लगेच त्याचा निषेध करायला गल्ली बोळातून संघटना तयार होतात. काहीही झालं कि स्त्रीवरील अत्याचारांचा पाढा वाचायचा आणि स्त्री मुक्तीवर तेच ते रटाळ भाष्य करायचे. तेवढे झाले कि स्वैराचार करण्यास आपण मोकळे हि आज कालच्या स्त्री मुक्तीची परिभाषा होऊ झालेली दिसत आहे. फक्त सहानुभूती गोळा करण्यापुरतच आता स्त्रियांचं स्त्रीपण मर्यादित झालेलं दिसतं. सोयीस्कररीत्या ज्यांना घोंगडीखाली घालता आणि काढता, त्यांना उगाच स्वत:ची जीवनतत्वे म्हणवुन घेऊन आपण कोणाची फसवणुक करतो आहे हा प्रश्न या स्त्रियांच्या मनात का येत नाही?



ज्या थोर स्त्रियांची उदाहरणं स्त्रीच्या उदात्तीकरणासाठी भाषणात सर्रास वापरल्या जातात त्यांचे जीवन चरित्र वाचुन बघायला यापैकी कोणालाच वेळ होणार नाही. पण निदान आपल्या वाटचालीचं थोडं सिंहावलोकन करून आपण खरच त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आहोत कि भरकटलेलो आहोत हे समजुन घेण्याची नितांत आवश्यकता आजच्या स्त्रीला आहे. त्या कर्तव्यपरायण स्त्रियांचा वारसा सांगणाऱ्या आजकालच्या स्त्रिया कर्तव्यपराङमुखतेचा मंत्र मनोभावे अंगीकारतांना दिसतात:
  • लग्नानंतर सासू सासरे सोबत राहणार नाहीत याची खात्री पटल्याशिवाय स्थळ पसंत पडत नाही. सासू सासरे नसणारं स्थळ म्हणजे पर्वणीच.
  • मुलांच्या संगोपनात जन्म देणं आणि स्तनपान(जमलं तर आणि जमेल तेवढंच) याखेरीज सगळ्या गोष्टींत कधी ना कधी स्त्री पुरुष समानता कडमडते. 
  • नवरे आणि घरचे सदस्य स्त्रियांच्या हातच्या जेवणाला हळु हळु करित कायमचे मुकतात. घरातील अन्नपूर्णा आता दुर्मिळ होत चालली आहे. 
  • मोदकांपासून ते पुरणपोळी पर्यंत सगळं दुकानातुन घरी येतं आणि तरीही सुटीच्या दिवशी नसती ब्याद म्हणुन कसेबसे सण साजरे होतात. 
  • मुलांसाठी आई पहिला गुरु नव्हे तर आया पहिला गुरु बनु लागलेली आहे. आईकडे आता पदव्या आहेत, नौकऱ्या आहेत आणि पैसा आहे. आपल्या गुरुत्वाची किंमत मोजुन आईने आता सगळं मिळवलं आहे. 

उदाहरणं संपत नाहीत, विचार करता करता मन खिन्न होऊन जातं.

पुरुष वाया गेला तरी स्त्री आपले घर सांभाळू शकते. मुलांना चांगले संस्कार देऊन समाज परत घडवायला मदत करत असते. पण ज्या समाजातील स्त्री वाईट झाली तो पूर्ण समाज अवनतीच्या मार्गाला लागतो हे इतिहासाने वारंवार सिद्ध केलेलं आहे.



मुळ स्त्री मुक्तीची चळवळ आपलं अस्तित्व हरवत आहे व त्या जागी हि दांभिक, एककल्ली आणि दुराग्रही अशी वळवळ समाजाच्या वाट्याला येत आहे. हि वाटचाल स्त्री मुक्तीकडे नसुन स्त्रीत्वा पासुन मुक्तीकडे जाते आहे असे जाणवते. आणि ज्यांना स्त्रीत्वा पासुनच मुक्ती हवी आहे त्यांनी स्त्री म्हणवून घ्यायची तसदी तरी का घ्यावी असा आवेगपूर्ण प्रश्न मनात येतो?

स्त्री मुक्ती सारख्या समाज प्रबोधक चळवळीची समाजाद्वारे अशीच दिशाभुल होत राहिली आणि हीच जर स्त्री मुक्तीची परिभाषा रूढ होणार असेल तर काही शतकांनी फक्त जननेन्द्रिय मादीचं आहे म्हणून स्त्रीला 'स्त्री' म्हणून ओळखल्या जाईल. तेंव्हा एका अर्थी आपला समाजच स्त्री मुक्त होऊन गेलेला असेल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

मनाचा कळफलक