मी संस्कृती बोलते आहे



संस्कृतीची सुरकुतलेली वस्त्रे पांघरण्यापेक्षा देवानं दिलेलं यौवन धन दिसु दे कि जगाला. त्यात वावगं काय आहे? उलट पुण्यच लाभेल.

हा सुविचार एके दिवशी युवकांच्या एका घोळक्यातुन कानावर आला. मी म्हटलं असेल बाबांनो, तसंही असेल. मला पटो न पटो हा प्रश्नच आता उरला नाही. कारण मी आता म्हातारी झाली आहे, वयानी नाही पण बहुधा विचारांनी. जग खुप पुढे गेलंय, उन्नत झालंय. माझी मात्र या वेगवान युगाशी जुळवुन घेतांना पुरती दमछाक झाली. आता हेच बघा ना सगळे अगदी गांधीजींच्या जीवनशैलीचं मनापासुन अनुकरण करत आहेत. आपण दोन कपडे कमी घातले तर कोण्या गरजु गरीब व्यक्तीला अंगावर घालायला कपडा मिळेल असं म्हणत गांधीजींनी एक वस्त्री पोशाख म्हणजे पंचाचा स्विकार केला होता. आजची युवा पिढी तर गांधीजींच्या दोन पावलं पुढेच आहे, कमी कपडे घालण्यात. एका पंचाच्या कापडात दोघं तिघं अगदी आरामात निभावुन नेतील. 

मी माझा पेहराव मोडीत काढु शकले नाही.


आणि हो स्त्री-पुरुष समानतेमुळे काय झक्कास प्रगती झाली आहे समाजाची. अगदी काही भेद राहिला नाही. अगदी म्हणजे क्रांतिकारी पिढी आहे बर का आजची.  स्त्री आजकाल केस खुरटे ठेवण्यात धन्यता मानते आणि पेहराव देखील पुरुषीच. मग पुरुषांनी तरी का मागे राहायचं. त्यांनी पण केस लांब वाढवुन डोक्यामागे बकरीच्या शेपट्या बांधायला सुरुवात केली. सौंदर्य प्रसाधनं वापरायला सुरुवात केली. आणि कानात, नाकात डूलं घालुन स्त्री-पुरुष समानतेला बऱ्यापैकी हातभार लावलाय. मी तर बरेचदा आता मुलामुलींच्या घोळक्यातील मुलं कोणती आणि मुली कोणत्या ओळखण्याचा खेळ खेळते. आणि अलीकडे माझे अंदाज सपशेल चुकायला लागले आहेत. स्त्री-पुरुष समानतेचा हा विजयच नाही का?

असेल बापडा, मी सांगितलं कि मघाच, मी आता म्हातारी झाली आहे अगदी जख्ख म्हातारी.



होय, मी संस्कृती बोलते आहे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

मनाचा कळफलक