प्रेम हे एकतर्फीच असतं


प्रेम हे एकतर्फीच असतं, कारण प्रेम हे नेहमी निर्व्याज आणि निस्वार्थी असतं. प्रेमात पडलेला माणुस हा फक्त देतो, देतो आणि देत राहतो. मी इतकं प्रेम करतोय तर समोरच्याने पण माझ्यावर तेवढंच प्रेम केलं पाहिजे हा हिशेबी विचार त्याच्या मनात कधीच येत नाही. तराजुत तोलल्या जाणारं ते प्रेम नव्हे.  मी तुझ्यावर प्रेम करतो अशी शाब्दिक व्यक्तता जिथे वारंवार होते तिथे बहुतेक प्रेम निखालस नसावं. कारण मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणणाऱ्या माणसाला समोरच्याकडून मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो हे उत्तर अपेक्षित असतं. आणि ते मिळालं नाही कि त्याचा त्याला त्रास होतो. म्हणजे हि फक्त एक प्रकारची  देवाण घेवाण असते. प्रेम ही काही बोलुन सिद्ध करण्याची गोष्ट नाही. सहसा आपल्या कृतीतुन आपण  प्रेमाची व्यक्तता करीत असतो. प्रेमाची प्रचिती, जाणीव हि प्रामुख्याने भावनात्मक पातळीवर असते. 


आजकाल प्रेम हा शब्द फार सहज आणि सैल रीत्या वापरल्या जातो. एकेमेकांविषयी शारीरिक आकर्षण आणि विषय वासना दर्शविण्यासाठी हा शब्द लोक बिनधास्त वापरतात त्यामुळे ह्या शब्दाचा अर्थ आणि भावार्थ दोन्ही गढुळ झाले आहेत. कोणी तरी माझ्यावर प्रेम करावं किंवा मी कोणावर तरी प्रेम करावं असं वाटणं हा नैसर्गिक विषय वासनेचाच एक रंजक विस्तार असतो. आज कालच्या भडक आणि दिखाऊ वृत्तीच्या जगात माणसाचे मानसिक स्वास्थ्य तर खालावलेले आहेच, मानसिक पातळी सुद्धा खालावली आहे. नैतिक बंध आणि मौलिक ठेवण यांचा भरपुर ऱ्हास झालेला आहे. खरं प्रेम वगैरे पहायला, अनुभवायला मिळणं दुर्मीळ आहे. अर्थात सांप्रत प्रेमवीरांना हा विचार पटणार नाही आणि आवडणारही नाही पण सत्य हेच आहे. इतिहासातील प्रेमवीरांना वेड्यात काढणारी हि पिढी आहे. लैला-मजनु, हीर-रांझा, सोनी-माहिवाल या अमर प्रेमी युगुलांचा आदर्श बाळगणं या पिढीला केवळ अशक्य आहे.



आज जो तो व्यावहारिकतेला प्राधान्य देतो. भावनांना एका मर्यादेबाहेर जीवनात स्थान नाही. भावनाप्रधान माणसाला दुबळं ठरवलं जातं. पदोपदी तुम्हाला इंग्रजीतला सल्ला मिळतो, "Be practical". भावनिक बुद्धीमत्ता( emotional intelligence) नावाची एक नवी टुम निघाली आहे. जो भावनांना भीक घालत नाही तो भावनिक बुद्धीमान ठरवल्या जातो. नात्यांमध्ये पुर्वीसारखी आपुलकी व बांधिलकी न राहता ती आता केवळ एक सोयीची विषयवस्तु झालेली आहे. आजकाल होणारी लग्नंं (नव्हे सौदे, नव्हे करार) या बदलाचे ठसठशीत उदाहरणं आहेत. आणि जेव्हा नात्यांमध्ये व्यवहार बघितला जातो तेंव्हा घराचा बाजार व्हायला वेळ लागत नाही. म्हणुन प्रेमाच्या आणाभाका घेऊन विवाहबद्ध झालेली जोडपी सुद्धा बेबनाव होऊन विभक्त होतांना दिसतात. नातं तोडणं हे आता नोकरी सोडण्यासारखं होऊन बसलंय. आमचे विचार जुळत नाही म्हणुन आम्ही आपसी सहमतीने   घटस्फोट घेतोय हे तोंड वर करून सांगतांना यांच्या कपाळावर एक आठी पडत नाही.  पंधरा दिवसात नविन लग्नासाठी आंतर्जालावर जाहिरात टाकली जाते. इथे ह्यांच्या तथाकथित प्रेमाचं पितळ उघडं पडतं.



जर प्रेम खरं असलं तर तिथे व्यवहाराला थारा नसतो. तिथे अपेक्षा रुजु शकत नाही. फक्त रुजतं निखळ, निर्व्याज प्रेमाचं रोपटं जे दातृत्व आणि त्यागाच्या मशागतीने बहरत असतं. आणि असंच एकतर्फी प्रेम जिथे दोन्ही जोडीदारांकडुन केल्या जातं त्या घरट्यात नांदतो ह्या पृथ्वीवरील स्वर्ग.



माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तुझे प्राण
उरले न वेगळाले




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

एक छोटीशी पुडी