अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद चौथा [रागावणारं मन]

पांथ पहिला:  हे ऐका, एका प्रवचनातील वाक्य.

क्रोधी और शराबी बिलकुल एक जैसे है. शराबी के कदम डगमगाते है क्रोधी के भी. शराबी बोलना कुछ चाहता है और बोल कुछ जाता है, क्रोधी भी. क्रोध में आदमी ऐसे काम कर देता है जो सिर्फ नशे में हि किये जा सकते है. शराबी होश में आने बाद पछताता है क्रोधी भी. दोनो कहते है फिर कभी न ऐसा न करुंगा लेकिन बार बार वही भुल करते रहते है.

तुम्हाला काय वाटतं?

पांथ दुसरा: क्रोध, राग. आपल्याला राग का येतो? जर एखादी घटना आपल्या मनाप्रमाणे घडली नाही किंवा कोणी आपल्या मनासारखं वागलं नाही तर. पण अगदीच तसे नाही, रस्त्यावरच्या माणसांनी गाडी चुकीची चालवली तरी राग येतो. खर तर जे आत आहे तेच बाहेर येतं. नाहीतर एकाच प्रसंगाला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या आल्या नसत्या. रागावणं हे बाहेरच झालं. राग का येतो हे शोधायला पाहिजे. तो आत कुठे आहे ते शोधायला पाहिजे.

पांथ पहिला:  हो ना विचित्र आहे रागाचं कोडं. बर क्रोधाचा मुळ अहंकार आहे असं म्हटलं तर मग स्व:ताचा राग का येत असेल.

पांथ दुसरा: अहो आपण स्वतः शी बोलतो सुद्धा. तसच स्व:तावर रागावतो.

पांथ पहिला:  हो.  म्हणजे आपण दोन आहोत.

पांथ दुसरा:  असं मी समजतो.

पांथ पहिला:  पण मग कोणाला कोणाचा राग येतो

पांथ दुसरा: कोण कोणाशी बोलतो?

पांथ पहिला:  आपलं एक मन दुसऱ्या मनाशी. पण मग राग नेहमी एका मनाचा दुसऱ्या मनाला येतो का.

पांथ दुसरा: तसं तर मग सारखं रागवायला पाहिजे. कारण कायमच दोन विरुद्ध विचार चालूच असतात.

पांथ पहिला:  हो अर्थात काही कारण लागतं म्हणा. ते कितीही क्षुल्लक असो.

पांथ दुसरा: बाहेरच कारण नसतंच.

पांथ पहिला:  मला कार्यालायात पोहोचायला उशीर झाला माझा मलाच राग येतो.

पांथ दुसरा: ह्म्म्म!

पांथ पहिला:  कधी कधी तर चाबी कुलपात जात नाही म्हणुन संताप होतो. अर्थात त्यामागे आपलं अचेतन काम करत असतं हे ठाऊक आहे. पण तरी सगळंच कठीण आहे. गुरुजी म्हणतात क्रोधाची पहली सुक्ष्म लाट येते तिला पकडा.  आणि ती कशी वादळात रुपांतरीत होते ते पण बघत रहा. आणि मग ती कशी परत निघुन जाते ते पण बघा.

पांथ दुसरा: हम्म! सुरुवातीला राग आल्यानंतर कळतं. अशा वेळी मनाने जरा मागे जाऊन परत घडलेली घटना बघायची आणि विश्लेषण करायचं. हळुहळु राग येण्याआधी कळायला लागेल.

पांथ पहिला:  हो ना. करायला पाहिजे. मी ह्या सगळ्याला अहंकार म्हणुनच बघतो आणि त्याच्याशी माझी लढाई चालु आहे. लढाई नाही म्हणता येणार. साक्षी राहण्याचा प्रयत्न चालु आहे.

पांथ दुसरा:  लढायला गेलात तर सगळा गोंधळ होईल. तुम्हीच तुमच्याशी कसे लढणार?

पांथ पहिला:  हो ते कळलं आहे. विरोध नको आहे.

पांथ दुसरा: त्यामुळे स्वतः स्वतःला लहान मुलासारखे प्रेमाने सांगायचे.

पांथ पहिला:  सततचा आत्म संवाद हा मला फार कारगर वाटतो. जेंव्हा राग येतो तेंव्हा आपलं मनच आपल्याविरुध्द षडयंत्र केल्यासारखं वागतं. अहंकाराच्या ठिणगीवर मस्त तेल ओततं आणि भडका उडवतं. किती नालायक आहे आपलं मन.

पांथ दुसरा: अच्छा म्हणजे तुम्हाला एवढं तरी पक्कं कळलेलं आहे कि तुम्ही आणि तुमचे मन वेगवेगळे आहात. तसं असेल तर मोठी उपलब्धी म्हणता येईल.

पांथ पहिला:  हो ते माहित आहे. ना मन, ना बुध्दी, ना अहंकार, ना चित्त, ना जाणीव, ना नेणीव. यापैकी मी काहीच नाही.

पांथ दुसरा: ते सगळं ठीक आहे.  पण तुम्ही  म्हणता  कि मन माझ्या विरुद्ध वागत. आपल्याला राग येत नाही , आपण राग आणतो. आपल्या साहेबासमोर कसे आपण गप्प बसतो. कधी आपण मनाचं ऐकतो कधी नाही.

पांथ पहिला:  आपण राग आणतो. इथे आपण म्हंजे कोण. साहेबासमोर गप्प बसायला पण आपलं मनच सांगतं ना आपल्याला. पण आतल्या आत त्याला शिव्या देऊन दात ओठ खायला लावतं.

पांथ दुसरा:  अगदी बरोबर.  कधी आपण त्याच ऐकतो आणि कधी नाही. कधी दात ओठ खाउन राग व्यक्त करतो , कधी सोडून पण देतो. म्हणजे तसे करण्याचे स्वातंत्र्य आपल्याकडे आहे.

पांथ पहिला:   मला सांगा शेकडो विचार मनात येतात, आपण त्यातल्या एकावर कृती करतो. हा निर्णय आपली बुध्दी देते. पण बुद्धीचा निर्णय बजावायला मनाचीच गरज असते.

पांथ दुसरा: कधी बुद्धी देते, कधी स्मृती देते. पण त्यावर कशी प्रतिक्रिया काय दयायची ते आपण नक्की नियंत्रित करू शकतो. त्यासाठी आपण जाग पाहिजे आणि तीव्र इच्छा पाहिजे.

पांथ पहिला:  मला वाटतं  स्मृती निर्णय नाही देऊ शकत, स्मृतीचं विश्लेषण करून बुध्दीच शेवटचा निर्णय घेते आणि मनाला आदेश देते कि निर्णयावर कृती कर. आपण म्हणतो ना कळत पण वळत नाही. कळणं बुद्धीचा गुणधर्म आहे. वळणं मनाचा.

पांथ दुसरा: तसंही असेल. पण आपल्या हातात असतं हे आपण जोवर मान्य करत नाही तोवर काहीच होऊ शकत नाही. आपण जेव्हा आपल्या मनाचा ताबा घेऊ तेव्हाच काही घडू शकेल.

पांथ पहिला:  ते मान्य. मनावर आपण स्वार होऊ शकलो कि झालं.  सध्यातरी बरेचदा मनच माझ्यावर स्वार असतं.

पांथ दुसरा:  तुम्ही बुद्धी म्हणा किंवा काहीही म्हणा तरी ते माझाच भाग आहे ना?

पांथ पहिला:  हो, बुध्दी माझी आहे. पण मी बुध्दी नाही.

पांथ दुसरा:  हो.

पांथ पहिला:  एखादी गोष्ट आपल्याला पटत असते. पण तरी आपण ते मान्य करत नाही कारण अहंकार आडवा येतो. बुध्दी म्हणते हे बरोबर आहे पण मन मात्र कृती करायला राजी होत नाही. मन बुद्धी अहंकार अशी हि तिकडम आहे.

पांथ दुसरा: जे असेल ते. कधीतरी मान्य करावेच लागतेच, प्रश्न फक्त आज, उद्या कि अजुन कधी एवढाच आहे.

पांथ पहिला:  असं नाही. बहुत करून लोक हे मान्य न करताच जगतात आणि मरतात. बुद्ध काय म्हणतात. सम्यक मन सम्यक बुद्धी. असंच काहीतरी ना?

पांथ दुसरा:  हो.

पांथ पहिला:  म्हणजे मन आहेच. आपण त्याला बाजूला काढू शकत नाही. त्याला राजी करूनच आपण त्याच्याकडुन पाहिजे ते करवुन घेऊ शकतो.

पांथ दुसरा: पण आत्ता इतक्या खोलात जायची गरज नाही. आत्ता फक्त एवढेच जाण्याचे आहे की गोष्टी आपल्याच हातात आहेत. कारण तसे नसेल तर आपण काहीच करू शकत नाही.

पांथ पहिला:  हो. म्हणुनच रामदासांनी मनाचे श्लोक सांगितले. मनाचं समुपदेशन केलं.

पांथ दुसरा: ह्म्म्म. खरच आहे. पण माझा अनुभव असा आहे की मनाचे श्लोक अनुभवण्याआधी हे माझ्याच हातात आहे हे अनुभवणं फार महत्वाचे आहे. नाहीतर आपण शब्दांमध्येच फार अडकुन पडतो. मग आपल्याला हे माझं काम नाही सांगणारे मार्ग दिसायाला लागतात. मला हे तेंव्हा समजलं जेव्हा मला असं दिसलं कि अरे मी एकाच घटनेला किंवा परिस्थितीला वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहे. असं का व्हावं?

पांथ पहिला:  अच्छा!

पांथ दुसरा: मग कधी मी माझा प्रतिक्रिया जाणीवपुर्वक बदलुन पाहिली. मला ती बदलता आली. मग मजा वाटली.

पांथ पहिला:  

पांथ दुसरा: मग कळलं की हे तर माझ्याच हातात आहे. मग ह्याचा अभ्यास साधायचे मार्ग शोधले. मग कळलं की मनाला लहान मुलासारखा आंजारून गोंजारून सांगावं लागत. रागावून ओरडून चिडून ते अजिबात ऐकत नाही

पांथ पहिला:  ह्म्म्म! तेवढं मी सुद्धा जाणुन आहे कि जे काही करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे. कोणताही बहाणा नाही चालणार.

पांथ दुसरा: मग रागावतं ते मन का आणि मनावर विजय कोण मिळवत हे झाले शास्त्रीय विषय?  ह्यावर चर्चा विवाद होऊ शकतो.  मात्र प्रयोग आणि प्रयत्न  करूनच आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहचु शकतो.

पांथ पहिला:  हो पण तुम्ही प्रयोग केलाय ना. म्हणजे तुम्ही मनाला गोंजारून सांगुन पाहिलंय ना.

पांथ दुसरा: हो.

पांथ पहिला:  तो सांगणारा कोण होता त्या क्षणी? कशावरून ते तुमचं मनच नव्हतं? कारण जो मूळ आहे तो तर कर्ता नाहीच. तो साक्षी आहे. म्हणजे हा कोणीतरी वेगळा असणार.

पांथ दुसरा: तो सांगणारा कोण इथेच तर पोचायचंय. आणि म्हणुनच सांगतो आहे, सध्या शास्त्र आणि तर्कात फार खोल न शिरता थेट प्रयोग आणि कृतीतुन उत्तर शोधायचं. कारण अनुभवापेक्षा कुठलंही शास्त्र श्रेष्ठ होऊ शकत नाही.

पांथ पहिला:  बर. पटतंय तुमचं म्हणणं.

पांथ दुसरा: अनुभवी लोक सांगतात त्याप्रमाणे आपण मनाचे मालक झालो, शांत झालो कि आपण आपोआप तिथेच असतो. पण आत्ता ते वाचुन आणि बुद्धीने समजुन घेण्याची माझी तरी तयारी नाही.

पांथ पहिला:  बर.  म्हंजे आता कृतीतुन पुढे जायचं.

पांथ दुसरा: बरोबर बोललात.

पांथ पहिला:  बघु काय करता येईल. मी मागं म्हटल्याप्रमाणे सध्या तरी आत्म संवाद हेच माझं मुख्य अस्त्र आहे. माझ्या प्रत्येक कृतीचं मी विश्लेषण करीत असतो, स्वत:शीच.

पांथ दुसरा: नुसता आत्म संवाद कामाचा नाही. त्याला प्रयोगाची जोड देणं महत्वाचं.

पांथ पहिला:  प्रयोगही आहेत पण खुप छोटया स्तरावर. अजुन मोठी पायरी चढलेलो नाही.

पांथ दुसरा: मग करा प्रयत्न, हळुहळु राग येण्यापूर्वी जाग आली पाहिजे. आणि जाग आल्यावर हवी तशी प्रतिक्रिया देता आली पाहिजे आपल्याकडून.

पांथ पहिला:  तोच तर उद्देश्य आहे.

पांथ दुसरा: पण त्यासाठी वाचन, श्रवण भरपुर झालं. प्रयोग, कृती महत्वाची. म्हणुन तुम्हाला कित्येक दिवसांपासुन सांगतोय कि एखादं ध्यान शिबीर करा.

पांथ पहिला:    करणार.

पांथ दुसरा: चला निघुया आता फेऱ्या मारून झाल्या आणि बराच वेळ बसलो आपण.

पांथ पहिला:  मी फारच खोलात शिरत होतो. आज माझ्यामुळे उशीर तर नाही ना झाला तुम्हाला?

पांथ दुसरा: छे! छे! यापेक्षा अधिक आपल्या वेळेचा काय सदुपयोग असु शकतो. चला भेटूया. तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा! नमस्कार!

पांथ पहिला:  धन्यवाद, तुम्हाला सुद्धा होळीच्या खुप खुप शुभेच्छा! नमस्कार!



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

एक छोटीशी पुडी