अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

पांथ पहिला: नमस्कार!

पांथ दुसरा: हरी ओम!

पांथ पहिला: कुठे होतात इतके दिवस?

पांथ दुसरा: अहो इतके दिवस काय म्हणताय, फक्त ४ दिवस झालेत आपल्याला भेटुन.

पांथ पहिला: हो का, पण खरच असं वाटतं कि चांगले ८-१० दिवस झाले असतील. कोणी बोलायलाच भेटत नाही हो.

पांथ दुसरा: का ते करमरकर दिसत आहेत तिकडे, ते लोखंडे, ते तिकडे देशमुख कसलं तरी आसन करत आहेत, पडतील वाटतं आता.

पांथ पहिला: हा हा! अहो तसे बरेच आहेत हो पण त्यांच्याशी तुमच्यासारख्या आध्यात्मिक चर्चा नाही करता येत ना.

पांथ दुसरा: हो ते आहेच म्हणा.

पांथ पहिला: बर एक विचार कि विधान वाचलं कुठेतरी तेंव्हापासुन तुमची वाट बघत होतो. हिंदीत वाचलं होतं म्हणुन हिंदीतच सांगतो,

"बुढे होते होते सभी नास्तिक, आस्तिक हो जाते है. वो लोग तो प्रगाढ आस्तिक हो जाते है जिन्होने ईश्वर के अस्तित्व का जीवनभर प्रखरता से खंडन किया है, जैसे के वैज्ञानिक. मौत कि छाया पडने लगी तो ज्ञान कि अकड खोती जाती और अनजाने में समर्पण का भाव उठने लगता. वही समर्पण का भाव जो अगर सही वक्त पर उठने देते तो जीवन सार्थक हो सकता था. लेकिन हर बार उस भाव को ज्ञान और अहंकार के छोटे बडे कंकर पथ्थर डाल डाल कर दबाते रहे."

तुमचं काय म्हणणं या विधानावर?

पांथ दुसरा: मला नाही वाटत हे असं असेल म्हणुन. मी बरेच निवृत्त लोक बघितले आहे जे अजुन पण नास्तिक आहेत.

पांथ पहिला: अच्छा! पण निवृत्ती म्हणजे मरण जवळ येणे नव्हे. निवृत्ती नंतर १५-२० वर्षांनी हा बदल संभवत असावा, जेंव्हा शरीर बऱ्यापैकी थकलेलं असेल. आणि हे हि खरं कि अगदी सगळेच काही आस्तिक होणार नाहीत. पण बहुतेक तरी होत असणार. कारण त्याना जोखीम घ्यायची नसते. कुणी सांगावं खरंच असला बिसला तर देव.

पांथ दुसरा: देव हि एक संकल्पना आहे. संकल्पनेला जो वास्तव मानतो तो आस्तिक आणि जो मानत नाही तो नास्तिक. प्रत्येकाची संकल्पना वेगवेगळी असु शकते. आपल्या आकलनाच्या पलिकडे काहीतरी अगाध, अगम्य आणि शाश्वत आहे हे मानुन चालणारा माणुस म्हणजे आस्तिक. आणि पंचेन्द्रियांनी अनुभवता येणारे, विज्ञानाने सिद्ध होणारे किंवा तर्क बुद्धीने ज्याचा उलगडा होतो तेवढेच सत्य मानणारे लोक म्हणजे नास्तिक.

पांथ पहिला: इथे आस्तिकांचा प्रश्नच नाही. हे विधान फक्त नास्तिकांवर लागु आहे असं मला वाटतं. आणि नास्तिक माणुस हा शास्त्र वगैरे वाचण्याच्या भानगडीत पडत नाही. तो फक्त विज्ञान म्हणेल ते खरे असा पवित्रा घेतो. म्हणजेच तो काही ज्ञान स्वीकारतो आणि काही ज्ञानाचा अभ्यास न करताच ते नाकारतो. हे मला पटत नाही.

पांथ दुसरा: हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कोणतीही गोष्ट जी आपल्या अनुभवात नाही म्हणुन ती अस्तित्वातच नाही हि विचारसरणी म्हणजेच नास्तिकता. आमचे गुरुवर्य म्हणतात कोणीही नास्तिक असुच शकत नाही. ठामपणे देव नाही म्हणणे हि पण एक प्रकारची आस्थाच आहे.

पांथ पहिला: ते बरोबर असेलही. पण परत मला सांगावे वाटते कि इथे मुद्दा तो नाही. इथे मी जो देव मानित नाही त्याला नास्तिक संबोधतोय. तर ह्या वचनानुसार जीवनाच्या शेवटी त्याची आस्था हळुहळु बदलते असं म्हणु आपण हवं तर. ठामपणे देव नाही हे विधान व्यक्ती वार्धक्यात सहसा करीत नाही. त्यांचा नकार मावळत जातो.

पांथ दुसरा: असे उदाहरण माझ्या बघण्यात नाही.

पांथ पहिला:  खरं तर ते माझ्या पण बघण्यात नाही. आणि म्हणुनच ही चर्चा.

पांथ दुसरा:  पण काही अप्रिय घडल्यावर देवावरून श्रद्धा ढळलेले आणि कालांतराने श्रद्धा पुन्हा प्रस्थापित झालेले बरेच लोक मी बघितले आहेत.

पांथ पहिला:  मी सुद्धा.

पांथ दुसरा:  किंवा अगदी मृत्युच्या दाढेतुन वाचलेले किंवा हवेत जगत असतांना जीवनाने दाणकन जमिनीवर आदळुन दिलेले असे काही लोक मी नास्तिकाचे आस्तिक झालेले बघितले आहेत. पण जे मुळात नास्तिक आहेत ते अंतिम समयी काहीतरी बोध होऊन वा भीतीपोटी आस्तिक झाले असे काही मी सांगु शकणार नाही.

पांथ पहिला: बरोबर. बोध वगैरे व्हायलाच हवा असे नाही. हे आपोआप घडत असेल.

पांथ दुसरा: का ? भीतीपोटी कि जीवेष्णेपोटी?

पांथ पहिला: नाही सांगता येणार, काही असे काही तसे. नेणीवेतून म्हण. आणि मला वाटते हळुहळु अहंकाराचे होत जाणारे खंडन पण ह्यात सहयोगी होत असेल.

पांथ दुसरा: होऊ शकते.

पांथ पहिला: आणि जीवेष्णा कोणालाच टळली नाही उलट नास्तिकाची जीवेष्णा अधिक तीव्र असते. कारण तो आत्मा, पुनर्जन्म असले काही बिलकुलच मानित नसतो. म्हणजे नास्तिकाकडे वासनापुर्तीसाठी फक्त एकच जन्म असतो. आणखी एक म्हणजे, आपण ज्या गोष्टीचा विरोध करीत राहतो तिच्याबद्दल आकर्षण हळुहळु वाढतच जाते म्हणा ना.

पांथ दुसरा: हरी ओम! हे मात्र अगदी खरे बोललात तुम्ही.  खुपच छान व्यवस्था करून ठेवली आहे नियतीने.

पांथ पहिला:  हो ना.

पांथ दुसरा: पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि हीच पराधीनता लीनतेत रुपांतरीत झाली तर आस्था किंवा आस्तिकतेला जागवते. आणि प्रतिकारात रुपांतरीत झाली तर नास्तिकतेला.

पांथ पहिला:  हं!

पांथ दुसरा: प्रतिकाराची तीव्रता कमी झाली कि हळुहळु लीनता येऊ लागते.

पांथ पहिला:  हो आणि मला वाटतं शरीर थकलं कि सुद्धा लीनता येऊ लागते.

पांथ दुसरा: पण त्याची योग्य वेळ यावी लागते. प्रारब्ध कर्माचे भोग सुटत नाहीत. संचित कर्म उत्तम असेल तरच योग्य विचार आणि योग्य आचारास मनुष्य प्रवृत्त होत असतो. कधीकधी जन्मोजन्म लागुन जातात. आणि ह्या जन्मी कोणाची कशी वेळ आहे हे आपल्या आकलना पलिकडे आहे.

पांथ पहिला:  हो.  पण जीवन उर्जा संपत आली कि माणुस कशातही सहारा शोधु लागतो.

पांथ दुसरा:  मला वाटते जीवन उर्जा कमी झाली कि आत्मबोधाची ईच्छा प्रबळ होत असावी. शरीर/विचार/बुध्दी हेच शाश्वत मानत आलेल्यांना जीवन उर्जा क्षीण होत आल्यावर ईतर गोष्टींचा बोध होत असावा किंवा तशी त्यांची मानसिक तयारी होत असावी.

पांथ पहिला: किंवा मी पणाची झापड थोडी ढिली होऊन मग अंधुक अंधुक दिसायला लागत असेल.

पांथ दुसरा: परीक्षेची वेळ आली, अभ्यास काहीच झाला नाही आणि पुढच्या वर्गात तर जायचे आहे. तेंव्हा अगदी उनाड किंवा निष्काळजी मुलं देखील पुस्तकं घेऊन बसलेली दिसतात.

पांथ पहिला:  हो. कमीत कमी उत्तर पत्रिकेत एवढी प्रार्थना तो करतोच कि गुरुजी मला कृपया पास करावे. मी घरचा(कर्माने) खुप गरीब आहे.

पांथ दुसरा: हो. बघुन घ्या जरा. पुढच्या वर्षी(जन्मी) नक्की भरपुर अभ्यास करेन. तुमच्याकडेच शिकवणी लावील

पांथ पहिला: तुम्हाला काय वाटतं गुरुजी काय करत असतील हे वाचुन?

पांथ दुसरा: काय करणार, विदयार्थी निलंबित होणार.  त्याला सांगतील, मुर्खा हेच जर वर्षाच्या(आयुष्याच्या) सुरुवातीला कळलं असतं तर निघाला असता कि, आता देत बस पुरवणी परीक्षा.

पांथ पहिला:  हा हा हा!

पांथ दुसरा: चला बराच वेळ बोललो. आता निघायला हवं. सोबत एक गृहस्थ आहेत ते वाट बघत आहेत.

पांथ पहिला: बरं बरं, भेटु पुन्हा.  टाटा!

पांथ दुसरा: हरी ओम!

                                                              [ धन्यवाद! ]

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

एक छोटीशी पुडी