अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद दुसरा

पहिला पांथ: नमस्कार!

दुसरा पांथ: नमस्कार, नमस्कार! नविन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! आज बरेच दिवसांनी भेटलात.

पहिला पांथ: तुम्हाला सुद्धा नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!  थोडा बाहेरगावी गेलो होतो.

दुसरा पांथ: तेच म्हटलं. मागच्या वेळी आपला छान संवाद झाला होता. त्यानंतर काही योगच आला नाही. मग काय संकल्प नविन वर्षाचा?

पहिला पांथ: खरं तर विचार केलेला नाही मी. पण सध्या माझ्यासमोर असलेला प्रश्न म्हणजे वैराग्य जमवायला पाहिजे. किंवा त्यालाच वीतराग पण म्हणतात. ह्यालाच बनवावे म्हणतो संकल्प.

दुसरा पांथ: छान विचार आहे. पण खरच वीतरागी होणं कठीण काम आहे. मला वाटते बरेच लोक याच विवंचनेत असतील. मी पण आहे. माझ्यामते ती पंचवार्षिक योजना होईल.

पहिला पांथ: पंचवार्षिक कुठची, आयुष्य पण कमी पडेल.

दुसरा पांथ: हो म्हणजे सरकारी भाषेत कधीच पुर्ण न होणारी. कदाचित मागचं आयुष्य कमी पडलं म्हणुन या आयुष्यात धडपड चालु आहे.

पहिला पांथ: हो खरंय. मुलांना जन्माला घालायचं, गुंतायचं आणि नंतर त्यातुन बाहेर पडण्यासाठी धडपड. कशासाठी हा सगळा खटाटोप काही कळत नाही. मुलांसोबत राहुन त्यांच्यात न अडकता नाही का राहता येणार?

दुसरा पांथ:  मुलांना जन्माला नाही घातलं तरी अडकणारे आहेच कि इथे.

पहिला पांथ: ते कशात अडकत असतील देव जाणे. बरं मुलं बरोबर हवी असतात पण एका मर्यादेबाहेर आपण त्यांना रमवुन ठेवु शकत नाही.

दुसरा पांथ: म्हणजे हवा तो वेळ देऊ शकत नाही हेच ना?

पहिला पांथ: नाही तसं नाही. पुर्वी देऊ शकत नव्हतो, पण आता वेळ आहे. पण आता मुलं मोठी झालीत आणि त्यांना त्यांच्या वयाच्या मुलांची सोबत आवडते, हवीहवीशी वाटते. कदाचित त्यांना अपेक्षित तो संवाद आपण साधु शकत नाही किंवा असंच काहीतरी. हे अगदी स्वाभाविक आहे पण माझं मन सहजासहजी मानत नाही.

दुसरा पांथ: हं! कठीण आहे तो मोह सुटणं.

पहिला पांथ: माहित नाही. खरं तर या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे मी, पण तरी कसली तरी अस्वस्थता आहे.

दुसरा पांथ: असावी. बरी असते.

पहिला पांथ: त्यांचा वागण्याचं वाईट वाटत नाही, राग नाही येत. या अस्वस्थतेला काय नाव द्यावं कळत नाही.

दुसरा पांथ: म्हटलं ना, मोह. सुक्ष्म मोह.

पहिला पांथ: कसला पण?

दुसरा पांथ: नात्याचा. नात्यातील केलेल्या गुंतवणुकीचा.

पहिला पांथ: उलट त्याचं एक प्रकारे बंधनच जाणवतं. ती घरी असली तर मग मी उगाचच घरी रहाण्याचा प्रयत्न करतो. त्यांना पण ते असहज होत असेल का देव जाणे.

दुसरा पांथ: विचारा कि मग सरळ.

पहिला पांथ: सध्या घरी मुलं नाहित. आणि नको विचारायला, मग वाटत नसेल तरी त्यांना वाटायला लागेल.

दुसरा पांथ: हे काय आता. भीती का आणि कशाची?

पहिला पांथ: आणि त्याचे  उत्तर काहीही असले तरी फार उपयोगी पडणार नाही बहुतेक. बंधने आपणच बनवतो आणि मग आपणच त्यात अडकुन पडतो.

दुसरा पांथ: नको पडु देत. पण डोक्यात प्रश्न ठेवायचा का? अस्वस्थता अजुन वाढेल.

पहिला पांथ: अष्टावक्र म्हणतो तसं खरं तर प्रश्न सोडून द्यायचे आहेत.

दुसरा पांथ: बरोबर.

पहिला पांथ: जाऊ दया. विषय बदलुयात.

आज एक सहज जाणवले. मी कोण? चे उत्तर 'नेति नेति' असं देतात , मी शरीर नाही, मन नाही, भावना नाही. बघणारा आणि दृश्य एक असणार नाही. पण तसं असेल तर मग मी मला कधीच दिसणार नाही. मनाचा सगळा गोंधळ संपला कि मीच उरेन पण दिसणार नाहीच.

दुसरा पांथ: कारण दिसणे हि त्या जगातील संवेदना नाही. फक्त असणे.

पहिला पांथ: अगदी बरोबर. असणे आपण कधी अनुभवलेले नाही, कसे जमायचे?

दुसरा पांथ: अजुन तरी नाही. आणि जमायचा अट्टाहास आधी सोडायला हवा.

पहिला पांथ: हं. तसही अट्टाहासाचा काहिच उपयोग नसतो.

दुसरा पांथ: संचित असेल तर अजुन बरेच जन्म घ्यावे लागतील. फक्त मार्ग चुकता कामा नये.

पहिला पांथ: पोचल्यावरच कळणार मार्ग बरोबर होता कि चुक.

दुसरा पांथ: त्यासाठी गुरु अत्यंत आवश्यक. मलाही गुरुची वाट आहे.

पहिला पांथ: (लांब नि:श्वास टाकत) गुरू!

दुसरा पांथ:  का काय झालं?

पहिला पांथ: मला नाही वाटत माझी लायकी आहे गुरु ओळखायची.

दुसरा पांथ: लायकी ठरवणं पण गुरुच्याच हातात आहे.

पहिला पांथ: गुरुच शोधतो आपल्याला, आपण तयार झालो की असे मी कुठेतरी ऐकले किंवा वाचले आणि तेंव्हापासुन मी शांत झालो. वाट पहाणे, शोधणे बंद केले.

दुसरा पांथ: बरोबर. पण गुरुशिवाय होणे नाही. गुरु बिन ग्यान नही. आपण पात्र होण्याचा प्रयत्न करत राहणे एवढेच आपल्या हातात आहे.

पहिला पांथ: अस नका म्हणु. मला एका गुरुतुल्य व्यक्तीने सांगितले आहे की गुरुतत्व आपल्या आतच असते. कधी कधी ते जाणवते. जसं, व्यायामाचा कंटाळा येतो तेव्हा आतला एक आवाज सांगत असतो की हे बरोबर नाही उठ. तोच गुरुचा आवाज असावा. आपण मात्र बरेचदा त्याला दृष्टीआड करतो आणि मग पश्चाताप करतो.

दुसरा पांथ: तुम्ही म्हणता तसं गुरुतत्व प्रत्येकात असेलही, पण परम सत्यासाठी लागणारा गुरुभार आपल्या अंगी असणे दुर्मीळ आहे, कलियुगात तरी.

पहिला पांथ: देव जाणे.

दुसरा पांथ: अष्टावक्र म्हणतात आज अभी यही हो जा मुक्त. पण जनक राजाची पात्रता आणायची कुठुन.

पहिला पांथ: हो  ना. मला माझ्या आत्ता आत्ताच्या अनुभवावरुन वाटतं की अष्टावक्र म्हणतात तसं मुक्त होणं माझ्याच हातात आहे आणि आज इथेच ते शक्य पण आहे. मीच मला बांधलय इतर कोणीच नाही.

दुसरा पांथ: हो पण आपली निद्रा खुपच प्रगाढ आहे. अष्टावक्र लागणारच.

पहिला पांथ: नाही. खरं तर हे जे आपण आत्ता बोलतोय किंवा ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतोय,  योग्य वेळी याचा परिणाम नक्की होईल. संपुर्ण निद्रा नाही आहे, पण आपल लक्ष बाहेर आहे. बहिर्मुखी. सगळं बाहेरच दिसतय हि खरी अडचण आहे.

दुसरा पांथ: पण मग तीन तीनदा अष्टावक्र महागीता संपुर्ण ऐकून काही तरी फरक पडायला हवा ना. पडला असेलही कदाचित पण मग तो सूक्ष्म आहे. मला तरी अजुन तो जाणवत नाही.

पहिला पांथ: खरंय. बहुतेक पात्रतेचाच हा अभाव असावा.

दुसरा पांथ: चला बोलता बोलता खुप वेळ झाला जातो आता, नाही तर घरी जेवण मिळणार नाही.

पहिला पांथ: हो ना. अध्यात्माने पोट थोडीच भरणार. मी पण निघतो. भेटु परत लवकरच.

[ धन्यवाद! ]

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

एक छोटीशी पुडी

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा