पुस्तक समीक्षा - पडघम [रवींद्र शोभणे]


प्रकाशन: मॅजेस्टिक                                  पृष्ठसंख्या: ६८२                                     किंमत: ४५० रु.


महिन्याभरापूर्वी लेखक रवींद्र शोभणे यांची 'पडघम' हि कादंबरी हाती लागली. चांगले भारी भरकम ६८० पानांचे हे लिखाण आहे. वाचनालयातुन आणतांना थोडी चाळली तर बरी वाटली.  कॉंग्रेस, आणीबाणी, इंदिरा गांधी, जनता दलाचा उदय आणि अस्त अशा राजकिय अंगाने जाणारी ती वाटली. एवढे मोठे पुस्तक वाचुन काढणे म्हणजे वेळेचं नियोजन आलं. मी जिद्दीने ती वाचायला सुरु केली. परंतु ३०-४० पानं संपता संपता खरे स्वरूप समोर आले. तिचा मुळ गाभा दलित विरुध्द ब्राम्हण संघर्ष असुन तो प्रभावी बनविण्यासाठी तत्कालीन राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि नाते संबंधातील गुंतागुंत या गोष्टींचा आधार घेतला आहे. असे नसल्यास मग लेखकाचा उद्देश्य वाचकापर्यंत स्पष्ट पोहोचलेला नाही हे नक्की समजावे. हि एक राजकीय कादंबरी नक्कीच नाही त्यामुळे ज्यांना खरेच राजकारणातील इतिहासाची आवड आहे त्यांनी हिच्या वाटेला जाऊ नये, निराशा हाती लागेल. स्वातंत्र्या नंतरच्या राजकिय पटलावर आधारीत बरीच इतर चांगली पुस्तके सापडतात.

पात्रांचा बजबजाट हे या लेखनातील एक अपयश आहे. केवळ राजकारणाची पार्श्वभूमी असल्यामुळे लेखकाला कार्यकर्ते गोळा करण्याचा मोह आवरला नाही असे वाटत राहते. तब्बल २५ ते ३० पात्र या कादंबरीत आळीपाळीने डोकावत राहतात.  लेखकाने प्रत्येक जोडीची वेगळी कथा लिहुन मग त्या कथा एकत्र विणलेल्या आहेत हे जाणकार वाचकांना जाणवेल.

कथेचा दलित नायक भानुदास धवणे ह्याचा पिचलेल्या परिस्थितीतुन उत्कर्ष, त्यासाठी लाभलेले गुरुजनांचे,मित्रांचे सहाय्य आणि प्रत्येक टप्प्यावर त्याच्या जीवनात प्रवेश आणि प्रस्थान करणारी एक स्त्री आणि अगदी ताटात वाढुन येत राहणार त्याचं यश. बऱ्याच गोष्टी त्याच्या जीवनात अगदी सहज घडत गेलेल्या दाखवल्या आहे. दलित विरुध्द ब्राम्हण संघर्ष असुन एकही ब्राम्हण पात्र ह्या नायकाचा विरोध करत नाही. झाडुन पुसुन सगळे ब्राम्हण अगदी देव माणसं हवी ती मदत करीत सुटतात. त्यांच्या देवपणाचं आणि चांगुलपणाचं अगदी अपचन व्हायला येतं.

लेखकाचं शरीर संबंधांबद्दलचं चित्रण अगदी अपरिपक्व आणि अनाठायी आहे. एकंदरीत स्त्री चारित्र्याला त्यांनी अगदी खालच्या पातळीवर नेऊन ठेवलं आहे. प्रत्येक २०-३० पानानंतर कोणतीतरी दोन पात्रं एकांतवासात येतात आणि समागम करतात आणि वाचकाने कादंबरी मधेच सोडु नये ह्याची काळजी घेतात. नायक भानुदास धवणेच्या नसानसात व्याभिचार भरलेला दाखविलेला आहे जो त्याला त्याच्या आईकडुन लाभलेला वारसा आहे. त्या एका पात्रापुरत हे मर्यादित ठेवलं असतं तर कदाचित ते विश्वासार्ह वाटलं असतं पण इथे तर प्रत्येक पुरुष(नर) आणि स्त्री(मादी) जणु संभोग करणे हा एकमात्र जीवनाचा उददेश असल्यागत एकमेकांची शय्यासोबत करीत सुटतात. प्रा. देशपांडेच्या घरात मृणाल सारखी व्यभिचारी प्रवृतीची मुलगी असु शकेल हे पचनी पडत नाही. आणि हे चित्रण १९७० ते १९८५ या कालावधीत नागपुर सारख्या शहरात अगदीच अविश्वसनीय वाटतं. या कादंबरीतील पात्रांचा शरीर संबंधांचा खालील तक्ता बघुन मी अतिशयोक्ती करीत नाही याची तुम्हाला प्रचीती येईल



एकंदरीत अत्यंत निराश करणारं हे लेखन आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अज्ञाताचा शोध संवादमाला

अज्ञाताचा शोध संवादमाला - संवाद तिसरा

एक छोटीशी पुडी