अज्ञाताचा शोध संवादमाला
माणसाच्या आयुष्यात कधी तरी अशी अवस्था येते जेंव्हा त्याला कशाचा तरी शोध खुणावु लागतो. पण कशाचा? ती वस्तु आहे कि फक्त अनुभुती. ह्या जगातील आहे कि परलोकीय? या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येकाला कितीतरी प्रश्न भेडसावत असतात. अशाच दोन पांथांमधील ह्या शोधाच्या वाटेवर उलगडत घडणारे हे संवाद आपण या सदरातुन बघणार आहोत. संवाद पहिला पहिला पांथ: मी खरंच कशाच्या शोधात आहे? देवाच्या? लहानपणापासुन देवाबद्दल ऐकलय पण त्या संकल्पनेचं मला कधीच आकर्षण वाटलं नाही. ह्याचा काय अर्थ काढायचा? देवाबद्दल माझी जी काही थोडीफार समज किंवा धारणा आहे त्याला सुसंगत असं काही ऐकायला मिळालं तर तिकडं मन आकर्षित होतं? पण मी या मार्गावर का आहे? मी काय शोधत आहे? दुसरा पांथ: माणुस हा एकच असा प्राणी आहे पृथ्वीवर ज्याच्या अंतरात अज्ञाताचा वेध घेण्याची हि ओढ आहे. आणि प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न उठणं अगदी स्वाभाविक आहे. फक्त कोणाच्या मनात ते थोडे लवकर उठायला लागतात तर कोणाच्या मनात उशीरा. पण हे लवकर उशिरा ह्या आयुष्याच्या नव्हे तर आत्म्याच्या प्रवासाच्या संदर्भात आहे. मला माहित आहे मी आणखी एक गुढ शब्द वापरतोय 'आत्मा'. ...