सोपं नसतं दैनंदिनी लिहिणं

इतकंही सोपं नसतं दैनंदिनी लिहिणं. हो म्हणजे खरंच काही मौलिक लिहायचं म्हटलं तर ते सोपं नसतं. नुसती दिनचर्या खरडून काढण्यात काही अर्थ नसतो. तर प्रत्येक दिवशी तुम्ही जे जगलात ते अगदी प्रामाणिकपणे ह्या पानावर उतरवणं सोपं नसतं. त्यासाठी तयारी लागते बऱ्याच गोष्टींची. एकतर माणसाने खरच जगायला हवं, ही पहिली गोष्ट. कारण येणारा दिवस कसाबसा ढकलून लावत, रहाटगाडग्यात अडकलेल्या पोहऱ्याप्रमाणं जगण्याला जर कुणी जगणं म्हणत असेल तर त्या माणसाला जीवन अजून कळालेलंच नाही. त्याच्या जगण्याची अजून सुरुवातच झाली नाही. होणारही नाही कदाचित, आयुष्य असंच निघून जाईल. माणसं तीच जगतात जी प्रत्येक क्षणाची साक्षी असतात. जेवतांना ती फक्त जेवतात, संपूर्ण लक्ष ताटावर केंद्रित करून, प्रत्येक पदार्थाची चव घेत, आस्वाद घेत आणि प्रत्येक घासागणिक ईश्वराचे आभार मानित. काम करतांना ती फक्त काम करतात, अगदी मनापासून. त्यांच्या कामावरही प्रेम जडलेलं असतं त्यांचं. आपलं काम उत्कृष्टच झालं पाहिजे असा अट्टहास असतो त्यांचा. आणि जेव्हां ती काहीच करत नाहीत तेव्हां ती काहीच करत नाहीत. तेव्हां ही माणसं निव्वळ आनंद उपभोगतात. प्रत्येक ...